तिच्या हातातील कागदी तिरंगा
नाईलाजाने फडकत होता
आणि तिचे हात दोन रुपयांसाठी
अगतिक झाले होते...
तिच्या डोळ्यांत पारतंत्र्याची
केवळ 12 वर्ष होती
आणि तिच्या पोटात होती
त्याच 12 वर्षांची आग...
जन्म झाल्यापासूनची 12 वर्ष...
एक तप ती पूर्ण करीत होती...
आणि पावसात तिच्या केसांच्या जटा
निथळत होत्या 12 वर्षांच्या व्यथा
तिच्यासह तिच्या जन्मदात्यांच्या....
स्वातंत्र्याचा अर्थ 4-5 तिरंगे
आणि 7-8 बिल्ले विकून
गोळा होणारे 20-25 रुपये...
तिच्या 12 वर्षात मी पाहिली
भारतमातेची 66 वर्षं
दिवसेंदिवस प्रतिगामी होत जाणारी...
चले जाव आणि इन्कलाबच्या आरोळ्या
टीव्हीवर पाहताना याला
स्वातंत्र्याचा इतिहास म्हणतात
असं कोणीतरी म्हणालं तिला....
तिची कळी खुलली
की मला भास झाला
माहित नाही...
पण दिवा लावायला आता
हात मोकळे ठेवलेच पाहिजेत
याची उपरती मला होत होती....