When nature has work to be done, she creates a Genius to do it.
राल्फ
वॅल्डो एमरसन या निसर्ग निबंधकारांच्या `नेचर'मधली ही उक्ती बरंच काही सांगून जाते.
माणसाने विज्ञानात प्रगती केली खरी पण ती प्रगती तंत्रज्ञान आणि रासायनिक प्रक्रियांवर
अधिक अवलंबून होती, आहे. मूलभूत संशोधनावर आधारितच ही प्रगती होती त्यामुळे माणसाचा
विकास झालाच. पण हे सर्व ज्या निसर्गाच्या जिवावर चाललं होतं, चाललं आहे त्याच्या भल्याचा
विचार केला गेला नाही तर तो आपला इंगा दाखवतोच. वादळ, वारे, भूकंप, महापूर, दुष्काळ,
अतिवृष्टी ही निसर्गाची आपले अस्तित्व दाखवून देणारी शस्त्रs आहेत. पण त्यावरही आपण
काबू मिळवला आहे असे मुजोरीने सांगणाऱया माणसाला निसर्गाच्या रौद्र रुपाचेही दर्शन
घ्यावेच लागते. एमरसनने म्हटलेला जिनियस हा सामाजिक आणि नैसर्गिक अशा दोन्ही बाबतीत
निर्माण होत असतो. या जिनियसमुळे समाजात थोडी सकसता येते. पण निसर्गापेक्षाही देवच
मोठा त्राता आहे असं मानणाऱयांना निसर्गाच्या ह्या जिनियसची ही तमा नसते, हे खेदाने
म्हणावे लागते. उत्तराखंडात झालेल्या महापूराच्या निमित्ताने आपल्याला याची जाणीव झालीच
आहे. मात्र आता ज्याने निसर्गाच्या जिनियसत्वाचा पदभार सांभाळला आहे तो आहे एक मासा...
स्टिंग रे !
गणेशोत्सवाच्या
दुसऱयाच दिवशी निसर्गाने आपल्या स्टिंग रे नामक एजंट करवी आपली खेळी खेळली. दीड दिवसाच्या
गणपतींचे विसर्जन करायला पाण्यात उतरलेल्या 54 जणांना विषारी स्टिंग रे चावले ! गिरगाव
चौपाटी सारख्या गणपतीच्या काळातच नाही तर इतर वेळीही गजबजलेल्या किनाऱयाच्या समुद्रात
ही घटना घडली. गणेश उत्सव हा प्रदुषणाचा उत्सव म्हटलं जातं हे बहुधा निसर्गालाही आता
कळलं असावं. अन्यथा शार्प वंशीय असलेल्या ह्या शांत स्टिंग रेजना त्याने ह्या कामगिरीवर
पाठवलंच नसतं. भारतीय समुद्र अर्थात अरबी समुद्रात स्टिंग रे शक्यतो आढळत नाहीत. पण
ते उष्ण पाण्यात रमणारे असल्यामुळे भारतासारख्या उष्ण कटिबंधाच्या देशात येतात आणि
स्थायिक होतात. ते शक्यतो समुद्राच्या तळाशी असतात. समुद्राच्या तळाची माती अंगावर
ओढून घेऊन निपचित पडलेले असतात. जोपर्यंत त्यांना भूक लागत नाही किंवा त्यांना छेडलं
जात नाही तोवर ते जागा सोडत नाहीत. पूर्ण विकसित स्टिंग रेचा आकार साडे सहा चौरस फूट
तर वजन 350 किलो असतं. त्याची लांबलचक शेपूटच 70 ते 80 किलोची असते. स्टिंग रे पहिल्यांदा
अधिक प्रकाशात आले ते जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय क्रोकोडाईल हंटर स्टीव् आयर्विन ह्यांच्यावर
झालेल्या स्टिंग रेच्या हल्ल्यानंतर. स्टीवच्या छातीवर स्टिंग रेच्या शेपटाचा फटकारा
पडून शेपटाचा एक भाग हृदयात घुसला आणि ऑस्ट्रेलियाच्या पोर्ट डग्लस येथील बॅट रिफच्या
समुद्राकाठी `ओशन्स डेडलीयेस्ट'चे चित्रीकरण करणाऱया नॅशनल जिओग्राफिकच्या टीमसमोर
त्याचे निधन झाले. स्टीवला समुद्रातील विश्व नवीन नव्हतं. तरीही हे घडलं. कर्मभूमीवर
मृत्यू येतो वीर ठरतो. तसाच स्टीवही ठरला. पण त्यानंतर स्टिंग रे खलनायकाच्या भूमिकेत
जाऊन बसला तो कायमचा.
माणसाला
जनावरांच्या जगात हस्तक्षेप करण्याची खोड या जनावरांच्या हल्ल्यांना कारणीभूत असते
हे आपण नेहमीच म्हणत आलो आहोत. पण त्यापासून धडा घेतील तर ती मानवजात कसली ! पशू पक्षांना
त्यांचे हॅबिटेट बंद किंवा दुषित करुन ते प्रतिबंधित केले की ते ही माणसांच्या जगात
येतात. गणेश विसर्जनासाठी कोणी स्टिंग रे निद्रावस्थेत असतात तिथवर समुद्राच्या तळाशी
जात नाहीत. याचाच अर्थ समुद्रात अचानक झालेल्या आक्रमणानंतरच स्टिंग रे विसर्जन करणाऱयांपर्यंत
पोहोचले असावेत आणि त्यांनी आपला इंगा दाखवला असावा. यानंतर सुरक्षा यंत्रणेचे गुळमुळीत
उत्तर आलेच. पुढील सर्व विसर्जनांच्या दिवशी म्हणे चोख सुरक्षा ठेवून विसर्जनाची वेगळी
व्यवस्था केली जाणार आहे. असेल काही व्यवस्था तर असू दे. पण इतके जल प्रदुषण करुन वर
तुम्ही स्वतचीच व्यवस्था पहाल तर गणेशोत्सवानंतर समुद्रावर येणाऱया मंडळींना स्टिंग
रे सोडतील का ? जगा आणि जगू द्या हा माणसाने माणसासाठीच म्हटलेला मंत्र नाही तर माणसाला
वर्षानुवर्षे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सोबत करणाऱया समस्त सजीव जगासाठी आहे. याची
ज्या दिवशी उपरती होईल तो सुदिन. अन्यथा जंगलात मुक्त केलेले वाघही कंपन्यांच्या बाभळीच्या
पुंपणाला पार न करु शकल्यामुळे गावाकडे आणि शहरांकडे वळतातच आहेत. आता मासे आपला पक्ष
ठेवत आहेत. उद्या तुमच्या खिडकीवर बसलेल्या तुमचा पितर म्हणून आलेल्या कावळ्याने तुमचा
डोळा फोडला नाही म्हणजे मिळवलं !
निसर्गाची नासाडी थांबवा एवढंच म्हणून थांबता
येणार नाही. प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्मोकॉल, रासायनिक रंग आणि
मुख्य म्हणजे ध्वनी याचा वापर कमी नाही तर बंद करा... किंवा विसर्जनच बंद करा. देव
असताना बुद्धीचा वापर नाही... तर नसताना कुठून कराल?
0 Comments
Post a Comment