डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, `शिकल्या सवरलेल्यांनी माझा घात केला !' कधी नव्हे इतकी आज या शब्दांमधली बोच जाणवते आहे. 1956 नंतरच्या 56 वर्षात समाजाचं चित्र बदललेलं नाही. आरक्षणाचा फायदा उचलून काही मूठभर लोक उच्चविद्याविभूषित झाले. पण त्यांनी प्रस्थापित उच्चभ्रूंसारखे आपले राहणीमान तेवढे सुधारले. उर्वरित समाजाला धरणे, आंदोलन, मोर्चे यासाठी राखून ठेवले. किंबहुना त्याच्या दावणीला बांधले. रमाबाई, सिद्धार्थ, गौतम, इंदिरा अशा नगरांमध्ये असलेल्या झोपडपट्यातील बौद्धजनतेची अवस्था एकतर अधिक बकाल झाली किंवा ती तशीच बिकट राहिली. त्यांचे उन्नयन झाले नाही. पण त्यांनी कधीही उच्चभ्रूंच्या पंक्तीला जाऊन बसलेल्या `आपल्या पैकीं' विषयी तक्रार केली नाही. पण खैरलांजीसारख्या उद्वेगपूर्ण प्रकाराचं आपल्या सोयीने ह्या उच्चशिक्षितांनी केलेल्या मूल्यमापनाचं शल्य मात्र त्यांच्या मनात सतत सलत असतं. `धादांत खैरलांजी' हे नाटक ह्या प्रकारच्या मूल्यमापनावरच भाष्य करतं. 1956 पर्यंत संपूर्ण समाज एकरेषीय होता. पण संविधान आणि त्यामुळे सामाजिक स्थैर्य मिळाल्यानंतर आज जातीय संघर्षासोबतच वगीय संघर्षही दिसू लागला. जातीय संघर्ष अजूनही गावागावात दिसतो. तर जातीय आणि वगीय संघर्ष शहरांमधून उच्चशिक्षितांच्या वर्तुळात दिसतो. म्हणूनच खैरलांजीसारखी घटना घडली की त्याला वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून पाहिलं जातं. मग ज्याचा जसा वकूब तसं त्याचं मूल्यमापन. यात अनेकदा मूळ विषयाला हात न घालता त्याच्या अनुषंगाने येणाऱया सर्व बाबींचा विचार होतो. प्रा. प्रज्ञा दया पवार लिखित `धादांत खैरलांजी' हे नाटक अशाच मूल्यमापनाची मीमांसा करतं. खैरलांजीनंतर उमटलेल्या पडसादांची ही मीमांसा असल्यामुळे प्रबोधनाच्याच नाही तर आकलनाच्याही पातळीवर याचं विश्लेषण करताना म्हणावं लागेल की, लोकायत क्रिएशन्स प्रस्त़ुत प्रा. प्रज्ञा पवार लिखित आणि शिवदास घोडके दिग्दर्शित `धादांत खैरलांजी' हे नाटक क्लासेससाठी आहे, मासेससाठी नाही.
राजकुमार संतोषी दिग्दर्शित `दामिनी' या चित्रपटात एक संवाद येतो, `उर्मीका बलात्कार एक बार क्या हुआ, हर गली, हर नुक्कड, हर शहर, पुलीस थाना, अदालतमें उसका बलात्कार हुआ. बार बार हुआ !' पुन्हा पुन्हा त्याच त्याच घृणास्पद चौकशीला सामोरं जावं लागणाऱया दामिनीच्या संदर्भात हे वाक्य येतं. पण खैरलांजी प्रकरणातही हे वाक्य वेगळ्या संदर्भाने लागू होतंच. खैरलांजी प्रकरण हे निव्वळ निर्घृण अत्याचाराचं उदाहरण नाही तर त्याला चेहरा आहे तो जातियतेचा आणि त्या मानसिकतेतून होत असणाऱया निरंकुश अत्याचाराचा. प्रियांका आणि सुरेखा या स्त्रियाच फक्त याच्या बळी नाहीत तर सुधीर आणि रोशन हे मुलगेही आहेत. पण प्रामुख्याने प्रियांका आणि सुरेखालाच लक्ष्य केलं गेल्यामुळे याकडे पाहताना स्त्राrवरच्या अनन्य अत्याचाराच्याच कोनातून पाहिलं जातं. आज सर्वच मागासवर्गीय उच्चपदस्थांना `आरक्षणामुळे आमच्याही पुढे गेले आणि आता आमच्या डोक्यावर मिऱया वाटू लागले,' अशी मुक्ताफळे अधूनमधून ऐकावी लागतात. त्यात जर ती उच्चपदस्थ स्त्राr असेल तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून, जीव नकोसा होईपर्यंत तिचे मानसिक खच्चीकरण करुन संस्थेच्या लाजेखातर तिने राजिनामा द्यावा अशी खेळी खेळली जाते. `दामिनी' चित्रपटातील संवाद लागू पडतो तो इथे. खैरलांजी एकदा काय घडली, गावागावात, शहराशहरात तिची पुनरावृत्ती होतेच आहे. मात्र या प्रकारांचं व्यवस्थित मूल्यमापन होणं आवश्यक आहे, जे आपल्याकडच्या उच्चविद्या विभूषितांकडून होत नाही, हेच हे नाटक सांगते.
सुरेखा भोतमांगेच्या चारित्र्यावर देखील असल्याच बिनबुडाच्या शंका उच्चवर्णियांनी आणि त्यांच्या प्रस्थापित प्रसारमाध्यमांनी उपस्थित केल्या होत्या. `धादांत खैरलांजी'तील मुंबईत एका मोठ्या महाविद्यालयात इतिहासाची प्राध्यापिका असलेल्या वैशाली गजभिये (रेणुका बोधनकर) ही आपल्यावर होणाऱया अत्याचाराचा संबंध सुरेखा भोतमांगेवर झालेल्या अत्याचाराशी लावते. तिच्यासोबतही खैरलांजीच घडतेय असं म्हणतेय. ना धड ती स्वतवरल्या अत्याचाराचं मूल्यमापन करु शकत ना धड प्रियांका आणि सुरेखाच्या मृत्यूचं. शैक्षणिक, आर्थिक आणि सभोवताल या स्तरावर प्रियांका भोतमांगे आणि प्राध्यापिकेवर होणाऱया अन्यायात जमीन अस्मानाचं अंतर आहे. त्यांच्यात काही साम्य असेलच तर ते त्यांचं एक जातीय असण्याचं. हे व्यवस्थित माहीत असूनही आपल्यावर सुरेखाप्रमाणेच अन्याय होतोय असं म्हणत वैशाली सुरेखाच्या समान पातळीवर येते. मात्र त्याचवेळी सुरेखा आणि प्रियांकावर झालेल्या अन्यायाला कवडीमोल करुन टाकतेय याचं भान प्राध्यापिकेला रहात नाही. त्याचं भान या जोडप्याला येतं ते भोतमांगे कुटुंबाविषयी झालेल्या वैचारिक संघर्षानंतर. त्यावेळी हे नाटक खैरालांजीचा खरा प्रकार समोर आणण्याची अपेक्षा उद्धृत करत. उच्चभ्रूंमध्ये खैरलांजी घडतेय मात्र प्रत्यक्ष खैरलांजीच्या तुलनेत ती त्याची प्रतिकृती मात्र आहे. म्हणूनच ती धादांत अर्थात वरवरची किंवा नुसतंच जातीयतेचं म्हणून असलेल्या आवरणाची आहे.
हे आवरण यासाठीही आहे कारण आमची 80 टक्के जनता जशी वागत नाही तशी प्रा. वैशाली गजभिये आणि तिचा पती लेखक अमिताभ बनसोडे (अशोक केंद्रे) वागतात. म्हणजे लेखक पती आपल्या चित्रपटाच्या कथानकात व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावावर विवाहबाह्य संबंधांना मान्यता देतो. त्यावर प्राध्यापक पत्नी `आपल्या समाजातील पती इतके पुरोगामी आहेत का?' म्हणून पुरुषांना चिमटा काढते. सर्व मित्रमंडळ एकत्र बसून पंचशिलातील `सुरामेरय मज्जपमादठाणा वेरमणी'ला धाब्यावर बसवतात. उच्चभ्रू बौद्धांमध्ये नक्की कसकसले समज `चलता है'च्या धर्तीवर चालवून घेतले जातात, एका खैरलांजीचे मूल्यमापन करताना आपण नक्की कुठे पोहोचलो आहोत, हे सांगणारं हे उत्तम उदाहरण या नाटकात चपखलपणे येतं.




प्रा. प्रज्ञा पवार यांनी हे नाटक लिहिलेलं असल्यामुळे ते आत्मनिवेदन असल्याचं जाणवत रहातं. जळजळीत सत्यावर आधारलेलं नाटक असल्यामुळे त्यांनी सर्वच सत्यांशांचा यात वापर केला आहे. `हे मिथक आहे का भिमा ?' या संवादाने आपण स्वतशीच संवाद साधू लागतो. काही अनावश्यक गोष्टी आपल्याला लिबर्टीच्या नावावर चालवून घ्याव्या लागतात. उदा. वैष्णवीचं मानसोपचार तज्ञाकडे जाते हे सांगण्याचा प्रसंग टाळता आला असता.  नाटक सुरु होताच नेपथ्य लक्ष वेधून घेतं ते तीन खांबांमुळे. घराच्या या नेपथ्यात एका खांबावर बुद्धाचा, दुसऱयावर बाबासाहेबांचा तर तिसऱयावर चक्क गांधींचा फोटो दिसतो. गांधीचा खांब हा महाविद्यालयातील ऑफीस दर्शवणाऱया भागातील आहे हे नंतर कळतं. तोपर्यत गांधी नजरेला खटकत राहतात. घराचा सीन सुरु असताना तिथे गांधीचा फोटो काढून दुसरं काही वापरलं असतं तरी चाललं असतं.
`धादांत खैरलांजी'मध्ये प्रत्यक्ष खैरलांजी नाही. तर खैरलांजीनंतर झालेल्या लेखक, विचारवंत, ब्लॉगर्स, नाटककार, सिनेनिर्माते यांच्या वर्तुळात घडत आणि चर्चांमधून झडत असणाऱया खैरलांजीवर आहे. नाटक रंगमंचावर दाखल होण्याआधी काही दिवस दिल्लीच्या निर्भया केसच्या लागलेल्या निकालात त्या आरोपींना `रेअरेस्ट ऑफ द रेअर केस' म्हणून फाशीची शिक्षा झाली. मात्र संपूर्ण गावाने घडवून आणलेल्या खैरलांजीच्या निर्घृण हत्याकांडातील केवळ 8 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली म्हणजेच 25 वर्षाची. म्हणजे `खैरलांजी' ही रेअर केस सुद्धा नाही. कारण हे प्रकार अनंत काळापासून होत आले आहेत आणि आम्ही ते असेच सहन करायचे असंच सर्व उच्चवर्णियांना वाटतं हेच यातून अधोरेखित होतं. यावरचं भाष्य `धादांत खैरलांजी'मधून येणं अपेक्षित होतं. कारण आमच्याच उच्चभ्रूमधून एक `कँडल पिवालागली आहे. त्यांना सत्य कसं, कधी आणि कोण सांगणार ? या नाटकातच सांगितल्याप्रमाणे खैरलांजी हे प्रकरण एका नाटकात किंवा चित्रपटात सामावणारा विषय नाही. नाटकातील लेखक अमिताभ आपण नक्कीच खैरलांजीवर नाटक लिहू असं आश्वासन देतो. तो जेव्हा लिहील तेव्हा प्रा. प्रज्ञा पवार त्यांच्याकडून `निव्वळ खैरलांजी'च लिहून घेतील यासंबंधीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ते नाटक क्लासेससह मासेसलाही अपील होईल ही अपेक्षा.