४ ऑक्टोबर २०१८ 
लंडन 

"तिने" एका २७ वर्षाच्या तरुणाला दहशतवाद्यांच्या हातून मरताना पाहिलं. "ती" हतबल झाली पण ती गर्भगळीत झाली नाही. त्या तरुणाच्या तरुण नवविवाहित बायको रेबिका समोर पुढचं सर्व आयुष्य पडलं होतं, जगायचं कसं हा प्रश्न होता. तेंव्हा "तिने" रेबिकाला एक शिवणयंत्र दिलं, त्याने रेबिकाला आधार तरी मिळाला. रेबिकाला हा आधार देणारी होती बिनालक्ष्मी नेप्रम. मणिपूरची एक झुंझार कन्या जिला ४ ऑक्टोबर २०१८ रोजी लंडनस्थित Reach All Women in WAR (RAW in WAR- रिच ऑल वूमन इन वॉर) या संस्थेचा अॅना पोलिटकोवस्क्याया या शोध पत्रकाराच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार जाहीर झाला आहे. 

बिनालक्ष्मी नेप्रम 


अॅना पोलिटकोवस्क्यायाने रशियन विशेषतः चेचन्याच्या सरकारच्या भ्रष्टाचार आणि मानवाधिकार हनन करणाऱ्या घटनांना जगासमोर आणून रशियन सरकारला यासंदर्भात दखल घ्यायला लावली होती. मात्र तिच्या या पुढाकाराने अनेक धनदांडग्यांचे धाबे दणाणले, त्यांनी तिला धमकावलं, हल्ले केले, पण ती बधली नाही आणि आपलं काम सुरु ठेवलं. पण ७ ऑक्टोबर २००६ रोजी वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी तिच्या मॉस्को येथील घराच्या लॉबीमध्ये तिच्यावर काही नराधमांनी बंदुकीने गोळ्या झाडल्या आणि त्यात तिचा मृत्यू झाला. एका तडफदार पत्रकाराचा अशा प्रकारे झालेल्या या अंतामुळे पत्रकारितेच्या वर्तुळात वादळ उठलं. सत्य जगासमोर आणणाऱ्या सर्वच लोकांच्या मनात भय निर्माण झालं. यापुढे सत्य लोकांना सांगावं कि नाही, व्यक्त व्हायचं कि नाही असा प्रश्न पडला. हा प्रश्न आज हि भारतात कायम आहे हे आपण गौरी लंकेश यांच्या मृत्यूमुळे जाणतोच. मात्र अशा सत्यान्वेषी व्यक्ती खचून जाऊन कोषात जाऊ नयेत यासाठी त्यांच्या कामाला उद्युक्त करणं आवश्यक होतं. यातूनच Reach All Women in WAR (RAW in WAR) या संस्थेचा जन्म झाला. अॅना प्रमाणेच पत्रकारितेत किंवा आपापल्या परीसरात युद्ध सदृश परिस्थितीत जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या स्त्रियांना आत्मबळ देऊन त्यांना जगण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या स्त्रियांसाठी हा पुरस्कार दिला जातो.

अॅना पोलिटकोवस्क्या 

यंदा हे या पुरस्काराचं १२ वं वर्ष असून बिनालक्ष्मी सह बेलारूसच्या २०१५ साली साहित्याचं नोबेल पारितोषिक विजेत्या ७० वर्षीय स्वेतलाना अॅलेक्सिएविच यांनाही हा पुरस्कार विभागून देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. स्वेतलाना यांनी आपल्या साहित्यात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात परिस्थितीने गांजून गेलेल्या सोविएट मधील स्त्रिया, चेर्नोबिल अण्वस्त्र दुर्घटनेचे दुष्परिणाम भोगणाऱ्या स्त्रिया आणि अफगाणिस्तानातील सोविएट सैन्याचे तिथल्या स्त्रियांवर झालेल्या परिणामांचं यथोस्थित चित्र आपल्या साहित्यातून उभं केलं. बेलारूसच्या सरकार विरुद्ध लिहिल्यामुळे त्यांना देश सोडावा लागला होता. त्यांना जीवानिशी मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आणि तसे प्रयत्न हि झाले. काही काळ निर्वासिताचं जिणं जगल्यावर त्या साल २०११ मध्ये पुन्हा आपल्या घरी आल्या आणि नव्याने कामाला सुरवात केली. आज त्या कामाचं चीज झालं आणि त्यांना अॅना पोलिटकोवस्क्याया पुरस्कार दिला जाण्याची घोषणा झाली.     
स्वेतलाना अॅलेक्सिएविच 
बिनालक्ष्मीने रेबिकाला मदत केली पण मणिपूरच्या त्या दहशातीखालील क्षेत्रात रेबिका एकटी नव्हती जी दहशतवाद्यांमुळे एकाकी पडली होती. अनेकींच्या घरातील बाप, भाऊ, नवरा, मुलगा असे सर्व पुरुष दहशतवाद्यांनी टिपून काढले होते, कोणाला ठार केलं होतं तर कुणी दहशतवाद्यांच्या छावणीत अखेरची घटका मोजत होते. सरकार वर भिस्त ठेऊन चालणार नव्हती. अशावेळी “अत्त दीप भव” म्हणत आपण स्वत: सावरून इतरांनाही सावरणं हे निकडीचं होतं. त्यापूर्वी म्हणजे २००४ साली ती ऑक्स्फाम या  संस्थेसोबत काम करत असताना "Control Arms Foundation of India (CAFI)" ह्या संस्थेचीही स्थापना केली. हि संस्था दहशत आणि शस्त्राच्या बळावर आपल्या क्षेत्राचं लष्करीकरण करण्याला विरोध करीत होती. याच दरम्यान तिने रेबिकाप्रमाणे अन्य स्त्रिया पहिल्या आणि त्याच्या उन्नयनासाठी "मणिपूर वुमेन गन सर्वायवर नेटवर्क" सुरु केलं ज्यामुळे दशकानुदशके होरपळून निघालेल्या उत्तर पूर्व भारताच्या ब्रम्हदेशाच्या सीमेवर असलेल्या किमान २०,००० महिलांना जगण्याचा मार्ग सापडला. 

बिनालक्ष्मी नेप्रम 

पुरस्कार घोषित झाल्यावर बिनालक्ष्मीने पत्रकारांना सांगितलं कि तिची संघटना केवळ घरातील कर्ता पुरुष हरवून बसलेल्या स्त्रियांनाच मदत करीत नाहीत तर दहशतवाद्यांकडून बलात्कार झालेल्या आणि लैंगिक हिंसाचाराला बळी पडलेल्या स्त्रियांनाही मदत करते.  
बिनालक्ष्मी म्हणते, “प्रत्येक दिवस इथे जुलूम जबरदस्ती सुरूच असते. एवढंच नाही तर आमच्या क्षेत्रातून पळवून नेलेल्या आणि विक्रय झालेल्या मुलींचं प्रमाण हि देशात अधिक आहे.” त्यातूनही बिनालक्ष्मी पिडीत स्त्रियांना जगायला शिकवते आहे. अॅना पोलिटकोवस्क्याया पुरस्कार हे त्याचंच फलित आहे.