डॉ.
नरेंद्र दाभोळकर धारातिर्थी पडले... पण गड अखेर काबीज केला. अजून निशाण फडकवले नसले
तरी शत्रू नामोहरम झाले हे ही नसे थोडके ! जादुटोणा विधेयकावर राज्यपालांनी सह्या केल्या
आता ते विधेयक दोन्ही विधीमंडळात पास होईल तेव्हा खरी लढाई सुरु होईल. डॉ. नरेद्र दाभोळकर
यांच्यानंतर या विधेयकाला संमत करुन घेण्यासाठी सर्व महाराष्ट्रातून रेटा लागला आणि
दुसऱयाच दिवशी सरकारला उशीराचं शहाणपण सुचलं. हा रेटा खऱया अर्थाने लावला तो प्रसारमाध्यमांनी.
अनेक संघटनांनी रस्त्यावर उतरुन जादूटोणाविरोधी कायदा करण्याची जोरदार मागणी केली.
यात `थोडी जरी चाड असेल तर कायदा करा,' `कायदा करणे हीच डॉ. दाभोळकरांना श्रद्धांजली
ठरेल'... वगैरे पोस्टर्स प्रसारमाध्यमांमुळेच सामान्य माणसाला दिसले किंबहुना `कळले'...
आणि त्या सामान्य माणसालाही आपण कळत नकळत बुवा बापूच्या नादी लागून करीत असलेल्या `गुह्याचा'
शोध लागला. रस्त्यावर न उतरताही तो या अंधश्रध्दांविषयी बोलू लागला. हे घडलं ते दूरचित्रवाणी
आणि मुद्रित प्रसारमाध्यमांमुळे. आता प्रश्न असा उपस्थित होतो तो या प्रसारमाध्यमांनी
पोसलेल्या बुवा बापूंचं काय होणार हा...
सकाळी...
सॉरी, रामप्रहर झाला की धर्माचा प्रत्यक्ष जीवनाशी अर्थाअर्थी काहीही संबंध नसलेल्या
प्रवचनांचा रतीब टीव्हीवर सुरु होतो तो थेट 8 वाजताच्या पहिल्या फ्रेश बुलेटिनला थांबतो.
मग कोणीतरी दादा, भाऊ येऊन आज तुम्ही खुर्चीवर बसणार की सोफ्यावर ? ते सांगतो. त्या
दादा किंवा भाऊचा `अवतार' काय वर्णावा ! कोणत्या तरी देवाच्या सौभाग्यवतीत्वाचा कपाळभर
भरलेला मळवट, हातात रुद्राक्षाच्या डझनावारी माळा गुंडाळून भरलेल्या, सर्व ग्रहांना
आपल्या दहाही बोटांत कैद केलेलं, अंगात कफनी आणि त्यावर चट्टेरीपट्टेरी मफलर, केशसंभार
पाठीवर मोकळा सोडलेला. असा `अवतार' असलेल्या माणसासमोर लोक लगेच नतमस्तक होतात. म्हणून
तो दादा किंवा भाऊही मोठ्या भावाच्या अधिकारवाणीने आज तुम्ही अमुकच करा आणि तमुकच करु
नका असं सांगत असतो. पाहणाऱयाला वाटतं, `काय तेज आहे याच्या चेहऱयावर अध्यात्माचं!`
मग त्याने सांगितलेले उपास तापास, दान दक्षिणा, गंडे दोरे या सर्वांच्या तो आहारी जातो.
दुसरं
पर्व सुरु होतं ते रात्री 12 नंतर. हे टेली मार्केटिंग म्हणजे कळसच. यात ज्यांनी चित्रपट
सृष्टीतील एक काळ गाजवला पण त्यांच्याच काही चुकीच्या निर्णयांमुळे बॉलिवूडपासून पारखे
झाले असे गोविंदा, जॅकी श्रॉफ, टीव्ही वरचा अमर उपाध्याय आणखी असेच काही स्त्राr पुरुष
अभिनेते प्रेक्षकांच्या भावनांना हात घालत त्यांना एखाद्या दैवी शक्तीकडे आकर्षित करीत
असतात. एखाद्या मंत्रसिद्ध केलेल्या गणेश, देवी, शिव यंत्राविषयी परोपरीने सांगत असतात.
त्याची किंमतही त्याच्या मिळणाऱया फायद्यापेक्षा किती `मामुली' आहे, हे कळवळून सांगत
असतात. शंकराचा डोळा आपल्या हातात, गळ्यात बांधल्याने माणसाचीच काय पण कुत्र्या मांजरांचीही
नजर लागणार नाही असलं बुद्धीच्या पलिकडचं आणि उगीचच मुक्या प्राण्यांना गुन्हेगार ठरवणारं
तत्वज्ञान पाझरत असतात. त्यांना मिळणारा प्रतिसाद किती हा संशोधनाचा विषय असला तरी
आपला माल खपवण्याचा हा धंदा गेली अनेक वर्षे छोट्या पडद्यावर बिनदिक्कतपणे सुरु आहे.
टीव्हीसाठी
सेन्सॉर बोर्ड आवश्यक असण्याच्या मागणीला आता कोणी हिंग घालून विचारत नाही. ती मागणी
ही आता इतिहासजमा झालीय. आणि का होऊ नये? चित्रपटांचे सेन्सॉर नेमकी कुठे कात्री चालवतं
हेही आत्तासं कळत नाही. तिथे टीव्हीच्या सेन्सॉर बोर्डाची भ्रूणहत्या होणं स्वाभाविकच
होतं. अशा अवस्थेत टीव्हीवर चाललेल्या गचाळपणाच्या चिखलाची दलदल तर केव्हाच झालीय.
त्यात अखंड भारत डुंबतोय. मार्क्सने सांगितलेल्या अफूच्या गोळीचा ओव्हरडोस झालाय आणि
त्याला उताराच काही मिळत नाहीये. डॉ. दाभोळकरांनी तयार केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन
आणि जादूटोणा विरोधी कायद्याचा पार चोथा करुन त्याचा वटहुकुम निघतोय त्यालाही विरोध
करणारी टाळकी सक्रिय असताना टीव्हीवरच्या ग्लॅमरस बुवा बापूंना कसं अडवायचं हा मोठा
प्रश्न आहे.
अमिताभ बच्चन यांची स्नुषा ऐश्वर्याला विवाहासमयी मंगळ
होता म्हणून मंगल शांती, सचिन तेंडुलकरच्या करंगळीचं विघ्न संपवण्यासाठी नागबळी, विवेक
ऑबेरॉयचं करिअर मार्गी लागावं म्हणून त्याच्या नावात केलेला बदल अशा अनेक बाबी याच
प्रसारमाध्यमांनी पसरवल्या. त्यांच्या तथाकथित गुरुंकडे किती करोडोची `माया' आहे हे
ही त्यांनी दाखवलं. त्यावेळी त्या केवळ बातम्या होत्या पण आताही त्या कायद्याच्या कचाट्यात
येऊ नयेत म्हणून विधेयकाच्याच चिंध्या चिंध्या कशा झाल्या हे ही दाखवलं. आता तरी `पुरोगामी
महाराष्ट्रात चाललंय काय?' असं विचारणाऱया प्रसारमाध्यमांनी सकाळ आणि रात्री आपल्या
वाहिन्यांवरुन चालणारा प्रतिगामित्वाचा बाजार थांबवावा. देशात जाहिरात कराव्या आणि
वाहिनीसाठी पैसा उभा करावा अशी अनेक उत्पादनं आहेत. आपला जाहिरात विभाग असा बुवा बापूंच्या
अखत्यारीत देऊन कृतीहीन करु टाकू नये. आमच्यासारख्या रात्री 11 नंतर टीव्ही पहायला
बसणाऱयांना याचा उबग येतो आणि आम्हाला प्रश्न पडतो तो हा की जनतेच्या दैनंदिन जीवनाच्या
समस्या सोडवण्याच्या दाव्यावर गब्बर झालेले आणि चार्टर्ड प्लेन शिवाय प्रवास न करणाऱया
या बुवा बापूंच्या मुसक्या कोण आवळणार ? प्रसारमाध्यमं याचा विचार करतील काय ?
0 Comments
Post a Comment