चंद्रकोर
हिरवीकंच चंद्रकोर
वर पहाटेच्या सूर्यासारखं लालचुटूक
कुंकू
हरखून जात असशील नाही
आरशात स्वत:लाच पाहताना
तो सुद्धा तुला कौतुकाने
निरखत असेल, नाही?
मी सुद्धा मोहरून जाते
माझ्या वळणदार कमरेवरचा
आर्टिस्टिक मोर पाहताना....
तो हि तुझ्या चंद्रकोरी
सारखाच
हिरवाकंच...
अगदी तुझ्या पडीक शिवारात
शोभेल असा
आकाशाकडे डोळे लावलेला....
उपाशी मुलं, बेहाल शेतकरी,
तडतडलेली जमीन,
दंग्यात रडणारा,
मला मारू नका म्हणत
आपले हात जोडणारा अगतिक माणूस,
आपल्या हिरव्या डोळ्यात भय
साठवणारी मुलगी,
दुष्काळात अन्नाच्या दिशेने
रांगणारं बाळ
आणि ते आत्ता मरेल कि नंतर
मरेल म्हणून
अंतर ठेऊन टपून बसलेलं गिधाड,
निर्वासितांच्या तांड्यातून
अनाहूतपणे
समुद्राच्या वाळूत उपडी
पडलेलं पोरगं....
हे सर्व आर्टिस्टिक असतं
आमच्या विश्वात,
ठाऊक आहे का तुला ?
तरीही मी नातं सांगते तुझं आणि
माझं
त्या हिरव्याकंच टॅटूमुळे
तेच ते... तुझ्या भाषेत
गोंदण....
सॉरी, माझ्या भाषेत टॅटूच....
पण काल तू दिसलीस टीव्हीवर
रित्या गोंदणासह
वर नेहमीचा सूर्य नव्हता....
तुझ्या समोर शवपेटी होती.
तिरंग्यात लपेटलेली
Come on, don’t
tell me
I can’t
believe, what I can see
ए...
पण तू अशी नि:स्तब्ध का आहेस ?
त्याच्यावर
प्रेम केलं असशील तर
आधी
घेना रडून ढसाढसा...
आणि
मग खुश्शाल भर आपलं मळवट
घाल
ना हातभर बांगड्या
रहा
तुला हवं तसं,
त्याला
हवी असायचीस तशी.... रहा ना
सूर्याला
असं रूढी परंपरांच्या कुपीत
बंदिस्त
करता येत नाही
तुझी
चंद्रकोर एकटीच नाही नांदू शकत अशी
वैधव्य
हि काय मिरवण्याची बाब आहे ?
तुझ्या
कुशीतल्या नव्या विरासाठी
बघ
माझा टॅटूही असुसलाय
मनमोराचा
पिसारा फुललाय
तू
ही पदर खोच बये
मी
ही सज्ज आहे
नाही
गं... मेणबत्ती मोर्च्यासाठी नाही
तुझ्या
मुक्ततेला कवरिंग फायर द्यायला...
तुझ्या
सक्षमतेची बुरुज बांधणी करायला
नाही...
मी
नाही मोठ्ठालं कुंकू लाऊन,
कॉटनची
महागडी साडी नेसणारी,
मी
नाही फेमिनिस्ट
देश
विदेशातील सेमिनार्समध्ये वूमन पॉवरवर बोलणारी....
मी
नाही शिळ्या कढीला ऊत आणणारी
सगळीच
दु:खं आर्टिस्टिक नसतात ना
अगं...
माझी गणना सामान्यातच...
आहे मी तुझ्या सारखीच रोज
लढणारी
पण पती हरपलेल्या
स्त्रीला विधवा म्हणून जगायला
भाग पाडणं
मला मान्य नाही
तू तर वीरपत्नी
तुला सीमांची काय तमा !
मलाही आता लढायचंय ह्या
आघाडीवर
तुझ्यासोबत
तुझ्या चंद्रकोरी वर सूर्य
झळाळू दे सखे
तुझे
शिवार गजबजू दे सखे
माझा
मोर मोहरू दे सखे
तुझं
गोंदण आणि माझ्या टॅटूमधलं
चिरंतन
सख्य जपूया सखे...
हे
नातं जपूया सखे....
0 Comments
Post a Comment