कसा करू सांभाळ ?
“चल पटकन, निघ.” त्याने फर्मान सोडलं तसं त्याच्या बायकोने आधीच बांधून ठेवलेलं गाठुडं उचललं, त्याने ६ वर्षाच्या झोपलेल्या मुलाला घेतलं आणि पहाटे ३.३० वाजता त्या तिघांनी घर सोडलं. एक ट्रक इंदोरच्या दिशेने चालला होता त्याला हात दाखवून थांबवलं. ट्रक ड्रायव्हरने तिघांना आत घेतलं आणि ते इंदोरच्या दिशेने निघाले.
सकाळी घरी पोहोचले तेंव्हा घर शांत होतं आणि आता ते तसंच शांत राहणार होतं, १२ वर्ष पोसलेली अशांतता काळाच्या गर्भात दफन झाली होती. मन सुन्न झालं होतं पण काळजावर दगड ठेऊन आता पुढलं आयुष्य घालवायचं होतं. मुलाला शिकवून मोठं करायचं होतं, त्यासाठी लागेल ती मेहनत करायचं दोघांनी ठरवलं होतंच शिवाय आता त्यात कसलाही अडसर राहिला नव्हता!
मध्य प्रदेशातील बेतुल हा बेता बेतानेच विकसित होत असलेला आदिवासी बहुल जिल्हा. हजारो गृह उद्योग आणि लघू उद्योगाने इथला आर्थिक भर उचलला आहे. दिल्ली चेन्नई रेल्वे महामार्गावर हा जिल्हा येतो तसेच भोपालसह महाराष्ट्रातील नागपूर सारख्या शहरांना लागून असल्यामुळे ह्या जिल्ह्यात बऱ्यापैकी सोयी सुविधा आल्या आहेत. इथले आदिवासी हि आपल्या हक्कांच्या बाबतीत जागरूक आहेत. बेतुल हा अवर्षण असणारा जिल्हा असल्यामुळे इथे शेती हि अशक्यप्राय गोष्ट बनली आहे. पण शेतीच मुख्य व्यवसाय असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांचे इथे मोठे हाल होतात. त्यामुळे त्यांना बांबूच्या टोपल्या आणि विविध वस्तू बनवून त्या विकणं या सारख्या गृह उद्योगांवर अवलंबून राहावं लागतं. पण ‘कपिल धारा योजना’ हि सरकारच्या काही योजनांमधील एक आहे ज्यात आदिवासींना त्यांच्या शेतजमिनीत किंवा त्यांना आवश्यक असलेल्या जागी विहीर खणून दिली जाते. बेतुल जिल्ह्यातील कोलगावात राहणारा ब्रिज गोंड (४५) याच्या शेतजमिनीत पाण्या अभावी खुरट्या वनस्पती खेरीज काहीही नव्हते. कपिल धारा योजनेची माहिती मिळताच त्याने आवश्यक ते पत्रव्यवहार करून आपल्या शेतात विहीर खणण्यासाठी ६ मे २०१६ हा दिवस नक्की केला. यादिवशी त्याच्या पडीक शेतजमिनीत सकाळपासूनच सरकारी कर्मचारी येऊन जमिनीचं मोजमाप करीत होते आणि पाणी लागेल अशी नेमकी जागा शोधत होते.
जागेची पाहणी करीत करीत हे कर्मचारी शेतजमिनीत अधिक आत आत जात होते त्यावेळी त्यांना एक गुदमरवून टाकणारा, काहीतरी कुजल्यासारखा वास येऊ लागला. कोणीतरी जनावर मरून पडलं असावं असं वाटल्यामुळे नेमकं कुठे जनावर मरून पडलंय ते शोधू लागले. तेवढ्यात एक कर्मचारी ओरडला, त्याच्या आवाजाच्या दिशेने बाकी लोक गेले तेंव्हा त्यांनी पाहिलं कि मानवी पाय मातीच्या ढेकाळातून बाहेर आले होते. त्यांनी तातडीने जवळच्या सारणी पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. हा:हा: म्हणता हि बातमी कोलगावात आगी सारखी पसरली आणि ब्रिज गोंडचं शिवार माणसांनी भरून गेलं. काही वेळातच सारणी पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर विक्रम रजक आपल्या टीम सह घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या आदेशावरून गावकऱ्यांनी ढेकाळातून बाहेर आलेल्या त्या पाया भोवतीची माती उकरली तेंव्हा पूर्वीपेक्षा हि जीवघेणा दुर्गंध वातावरणात पसरला. तिथे एका अंदाजे १५-१६ वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. तिने काळ्या रंगाचा टी शर्ट आणि हिरव्या रंगाची लेगीन्स परिधान केली होती आणि तिच्या गळ्यात एक नायलॉनचा स्टोल होता. पोलिसांनी तिथे जमा झालेल्या गर्दीला विचारलं कि त्या मुलीला कोणी ओळखत असेल तर त्यांनी पुढे यावं. पण तिथले लोकं म्हणू लागले कि ती मुलगी त्या गावची नाहीये. ज्या प्रकारे त्या मुलीचा मृतदेह अशा निर्जन स्थळी पुरण्यात आला होता या अर्थी तिची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. तिला अन्यत्र मारून तिथे पुरण्यासाठी आणलं असावं किंवा तिथे आणून मारलं असावं. पोलिसांनी मृतदेहाचे फोटो काढले आणि प्राथमिक अहवाल तयार केला. मृतदेहाचा पंचनामा केला आणि तो उत्तरीय चिकित्सेसाठी रुग्णालयात पाठवून दिला. पोलिसांनी मृतदेहाच्या फोटोच्या कॉपीज काढून त्या कोलगावात ठिकठिकाणी लावल्या आणि गावकऱ्यांना आव्हान केलं कि त्या मुलीला ओळखणाऱ्यानी पुढे येऊन त्या मुलीच्या गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना मदत करावी.
दुसऱ्या दिवशी पोलिसांना मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल मिळाला, त्यानुसार मुलगी १५-१६ नाही तर ११-१२ वर्षांची आहे आणि किमान ७-८ दिवसांपूर्वी तिचा गळा दाबून खून केला गेला आहे. पोलिसांनी या अहवालावर डॉक्टरांशी चर्चा केल्यावर कळलं कि मुलीची शरीरयष्टी मजबूत असल्यामुळे ती तिच्या वयाच्या मानाने मोठी वाटते पण तिची मासिक पाळी हि अजून सुरु झालेली नव्हती. डॉक्टरांनी बलात्काराच्या शक्यतेचा स्पष्ट शब्दात नकार दिला.
त्याच दिवशी कोलगावातील एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून सांगितलं कि त्याच्या गावातील मंशाराम गोंड (५६) याच्या घरी काही दिवसांपूर्वी त्याने या मुलीला पाहिलं होतं. पोलीस लगेच आपली एक तुकडी घेऊन मंशारामच्या घरी पोहोचले. त्यावेळी मंशाराम घरी नव्हता, मात्र त्याची बायको आशा गोंड (५१) घरीच होती. पोलिसांनी आशाला मुलीचा फोटो दाखवला तेंव्हा ती दचकली. तिने सांगितलं कि ती तिच्या सख्या बहिणीची सरिताची मुलगी चांदनी आहे. तिने पोलिसांना सांगितलं कि ८-१० दिवसापूर्वी चांदनी आपले वडील दयाल वर्मन (३८), आई सरिता वर्मन (३६) आणि भाऊ कुणाल वर्मन (६) सह कोलगावात तिच्या घरी आली होती. ते सर्व कुटुंब ४ दिवस तिच्याकडे राहिले आणि पाचव्या दिवशी जेंव्हा ती सकाळी उठली तेंव्हा तिला सरिता किंवा तिच्या कुटुंबातील कुणीही घरात दिसलं नाही. तिने आपले पती मंशारामला विचारलं तर त्याने सांगितलं कि दयालला त्याच्या गावाच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रक ड्रायव्हरशी बोलणी केली होती. त्या ट्रकचा ड्रायव्हर त्यांना पहाटे गावी सोडणार होता. म्हणून दयालने पहाटेच सर्वाना उठवलं आणि त्या ट्रकने तो गावी कुटुंबासह गावी निघून गेला. आशाला ह्यात वावगं काही वाटलं नाही. खेडेगावात दळणवळणाची साधनं तशी कमीच, त्यामुळे अनेकदा अशा ट्रकवाल्यांना विनवण्या करून प्रवास करावा लागतो. मंशारामने हे सांगितल्या नंतर त्यावेळी ती आपल्या नेहमीच्या कामात गढून गेली पण आता चांदनीचा तो अस्ताव्यस्त अवस्थेतील फोटो बघून आशाच्या डोळ्यात पाणी तरारलं!
आशा कोलगावात आपले पती मंशाराम आणि मुलगा सुभाष (२१) सोबत रहात होती. मंशाराम जे मिळेल ते लहानसहान काम करायचा तर सुभाष बेतुलमध्ये एका फॅक्टरीत काम करायचा आणि तिथेच राहायचा. आशाने सांगितलं कि मंशाराम काम करून झालं कि रात्री एखाद्या दारूच्या अड्ड्यावर जातो आणि दारू ढोसूनच घरी येतो. मंशारामकडे फोन नव्हता. पोलिसांनी तिच्याकडून मंशारामच्या कामाचे ठिकाण आणि त्याच्या दारूच्या अड्ड्याचा पत्ता घेतला. पोलीस त्या त्या जागेवर गेले पण तिथे त्यांना मंशाराम सापडला नाही. पोलिसांनी त्या जागांवर निगराणी ठेवली. शेवटी रात्री ८ वाजता एका दारूच्या गुत्त्यावर मंशाराम पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याच्या चौकशीला सुरुवात केली. चांदनीचा फोटो बघून त्याने तिला ओळखलं पण तिचा मृतदेह सापडल्याचं पोलिसांकडून कळल्यावर तो हि बुचकळ्यात पडला कारण दयाल आणि कुटुंबासोबत चांदनी सुद्धा तिच्या घरी गेली असावी असं आशाप्रमाणे त्याला हि वाटत होतं. पोलिसांनी त्याला विचारलं की ते दिवसभर त्याला कोलगावात ठिकठिकाणी शोधत होते पण तो कुठेच त्यांना सापडला नाही. त्याच्या कामाच्या ठिकाणी पोलिसांना सांगितलं गेलं कि तो कामाला आलाच नाही. चांदनीचे फोटो कोलगावात ठिकठिकाणी लावलेले असताना ही त्याने फोटो पहिले कसे नाही आणि पोलिसांकडे स्वत:हून का आला नाही? मंशाराम उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांच्या लक्षात येत होतं कि तो खोटं बोलतोय. पोलिसांच्या २ थपडा पडल्या तसा मंशाराम खरं सांगायला तयार झाला. पोलिसांनी त्याची सविस्तर साक्ष नोंदवून घेतली. मंशारामने कबूल केलं कि त्याने दारूच्या नशेत दयालला चांदनीला मारण्यासाठी होकार दिला आणि त्याला मदत केली.
मंशारामच्या या साक्षीनंतर पोलिसांच्या समोर दयाल आणि त्याच्या कुटुंबियांना तातडीने पकडणं आवश्यक होतं. कारण मंशारामच्या अटकेची खबर त्यांना मिळाली तर ते परागंदा होण्याची शक्यता होती. पोलिसांनी मंशारामकडे दयालचा पत्ता विचारला तेंव्हा मंशारामने सांगितलं कि दयाल दर ४-५ महिन्याला घर बदलतो त्यामुळे त्याला दयालचा आत्ताचा पत्ता माहित नव्हता. दयालचा फोन नंबर हि त्याच्याकडे नाही पण सुभाषकडे आहे. मंशारामने एका कागदावर लिहिलेला सुभाषचा फोन नंबर पोलिसांना दिला. सुभाषला फोन करून पोलिसांनी तातडीने पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं.
दुसऱ्या दिवशी सकाळीच सुभाष पोलीस स्टेशनला हजर झाला तेंव्हा त्याला कळलं कि त्याचे वडील मंशाराम चांदनीच्या हत्येत आरोपी म्हणून आढळले आहेत. पोलिसांशी बोलताना सुभाषने सांगितलं कि कोलगावात आल्यानंतर दयालकाकाने मंशारामकडून त्याचा फोन नंबर घेऊन त्याला संपर्क केला होता. दयाल त्याला म्हणाला होता कि ते सर्व ४ दिवस कोलगावात राहणार आहेत, सुभाषने हि सुट्टी घेऊन गावी यावं म्हणजे त्याची हि भेट होईल. पण त्यावेळी सुभाषच्या फॅक्टरीत प्रचंड काम होतं म्हणून तो सुट्टी घेऊन गावी येऊ शकला नव्हता. सुभाषने दयालचा नंबर हि घाईघाईत सेव केला नव्हता. तेंव्हा पोलिसांनी सुभाषचा फोन घेऊन त्याच्या सर्व इनकमिंग कॉलर्सची व्यक्तिगत माहिती काढली. त्यात एक फोन दयाल वर्मनच्या नावावर अंकित होता. पोलिसांनी त्याचा टॉवर लोकेशन तपासलं तर ते इंदोरच्या भवानी नगरातील होतं.
पोलिसांच्या समोर आता आव्हान होतं ते एवढ्या मोठ्या भवानी नगरात दयालला शोधण्याचं ते हि अत्यंत सावधगिरीने, दयालला पोलिसांच्या तपासाचा सुगावा हि लागू न देता! त्यांनी एक शक्कल लढवली. पीएसआय सत्यजित आचार्य यांना रिक्षाचालक बनवून त्या रिक्षात सुभाषला बसवलं आणि त्यांना इंदोरच्या भवानी नगरच्या दिशेने पाठवलं. पीएसआयसोबत त्यांच्या रिक्षाच्या मागे त्यांची टीम हि येत होती. पीएसआय आणि सुभाष भवानी नगरमध्ये पोहोचले आणि सुभाषने दयाल काकाला फोन करून म्हणाला कि, “काका, मी आता इंदोरमध्ये आलो आहे, तुम्हाला भेटायचं होतं, कुठे येऊन भेटू तुम्हाला?” दयाल त्याला म्हणाला कि, “मी आता लवकुश विद्या विहार शाळेच्या जवळ सुरु असलेल्या इमारतीच्या बांधकामावर मजदुरी करतोय, तू इथेच ये. मी शाळेच्या समोर असलेल्या वडाच्या झाडाखाली उभा राहतो.” सुभाषने त्याला ठीक आहे म्हटलं. शाळेसमोर गेल्यावर लांबूनच सुभाषने वडाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या दयालला ओळखलं आणि पीएसआयला सांगितलं. पीएसआयने आपल्या टीमला कळवलं जी त्यांच्या मागेच येत होती. वडाच्या झाडाजवळ पीएसआयने आपली रिक्षा उभी केली आणि सुभाष ऐवजी ते स्वत: वडाच्या झाडाजवळ गेले आणि त्यांनी दयालला विचारले, “दयाल वर्मन ?” दयालने वळून “हो मीच दयाल वर्मन, बोला,” म्हटलं आणि पीएसआय ने त्याला चांदनीचा फोटो दाखवला. तो फोटो बघून दयालला घाम फुटला, “कोण तुम्ही, तुम्ही कोण ?” म्हणू लागला. पीएसआयने आपली ओळख “पोलीस” म्हणून सांगितली. पोलिसांच्या मागच्या गाडीतून २ कॉन्स्टेबल उतरले आणि तेही दयाल समोर उभे ठाकले. दयालची बोबडी तेवढी वळायची बाकी राहिली. दयालने सुभाषला हि पाहिलं आणि सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. पोलीस त्याला घेऊन पुन्हा सारणी पोलीस स्टेशनला आले आणि त्याची कसून चौकशी सुरु केली.
पोलिसांनी दयालला सांगितलं की, “मंशारामने गुन्ह्याची कबुली दिली आहे, त्यामुळे तू आता तुझा गुन्हा नाकारू शकत नाहीस, जे काही काही झालं ते खरं खरं सांगण्यातच तुझी भलाई आहे.”
दयालने म्हटलं कि, “मला माझा गुन्हा नाकारायचा ही नाही. मीच माझ्या मुलीला, चांदनीला आपल्या हाताने मारलं. कारण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता.” दयालने पोलिसांना चांदनीच्या हत्येमागचं जे कारण सांगितलं त्याने पोलीस ही हेलावून गेले.
दयाल मुळचा प. बंगालचा. साल २००३ मध्ये तो कामाच्या शोधात मध्यप्रदेशातील धार येथे आला, तिथे त्याला काकडीच्या शेतात काम करून काकड्या विकण्याचं काम मिळालं. धारच्या आठवडी बाजारात सरिता आपली आई आणि बहिणीसह बांबूच्या टोपल्या विकण्यासाठी येत असे. दयालची आणि सरिताची नजरानजर झाली आणि काही दिवसांच्या ओळखीनंतर दयालने तिला लग्नाची मागणी घातली. सरिता आदिवासीतील कोरकू जमातीची होती. त्यांच्या रीतीरिवाजानुसार त्यांचं लग्न झालं आणि लग्नानंतर ते दोघे इंदोरमध्ये राहू लागले. २००४ मध्ये सरिताने चांदनीला जन्म दिला तेंव्हा घर आनंदाने फुलून गेलं. तिच्या अवतीभवतीच दोघांचं विश्व निर्माण झालं होतं. दयालच्या घरी जणू परी आली होती! पण चांदनी १ वर्षाची होईपर्यंत तिच्या सामान्य मुल नसण्याचे काही संकेत मिळू लागले होते. ती दिवसा रात्री कधीही खूप रडायची आणि जेंव्हा रडायची तेंव्हा सर्व परिसर डोक्यावर घ्यायची. मोठी होत गेली तसं कोणावरही उगीच रागावणं, दरडावणं, ओरडणं, बाहुल्या, खेळणी, हाताला येईल ते फेकून मारणं असले प्रकार ती करू लागली.ती अधून मधून इतकी हिंस्त्र होत असे की बघणाऱ्याला तिची भीती वाटे. विशेष म्हणजे ती कशाने हि शांत होत नसे आणि थकून भागून मग स्वत: निपचित पडून जाई. दयाल आणि सरिता ओळखून चुकले कि चांदनी सामान्य मुलगी नव्हती.
चांदनी ३ वर्षाची झाल्यावर सुद्धा तिच्या स्वभावात काही बदल झाला नाही तेंव्हा दयाल आणि सरिता तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी निदान केलं कि चांदनी मंदबुद्धी मुलगी आहे. औषधांनी आणि व्यायामाने तिचं हिंस्त्र होणं थोडं कमी होऊ शकतं. डॉक्टरांनी तिचा औषधोपचार सुरु केला. औषधांनी खरंच चांदनीमध्ये बराच फरक पडला होता, ती आता पहिल्या सारखी हिंस्त्र होत नव्हती. ते बघून दयाल आणि सरिताला वाटलं कि चांदनी आता बरी झालीय, आता औषधांची गरज नाही, तसाही औषधांवर पैसे खूप खर्च होत होते, म्हणून त्यांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधं थांबवली. पण काही दिवसातच त्याचा अत्यंत वाईट परिणाम त्यांना दिसला. तिचा हिंस्त्र स्वभाव पुन्हा उफाळून येऊ लागला. पुन्हा डॉक्टरकडे जाऊन औषध तर सुरु केलं पण डॉक्टरांनी या वेळी दयालला एक धोक्याचा इशारा दिला की ती जसजशी मोठी होत जाईल तसतसा तिचा हिंस्त्र स्वभाव वाढत जाईल. दयालसाठी आता हि सर्वात मोठी चिंतेची बाब होती.
चांदनीचा हा हिंस्त्र स्वभाव कधीही उफाळून यायचा, त्याला वेळ काळ नसायचा आणि एकदा का ती हिंस्त्र झाली कि ती भिंतींवर लाथा मार, थपडा मार असले प्रकार करायची. यामुळे शेजारी पाजारी त्रस्त व्हायचे, ते त्याला काहीबाही बोलायचे, घर सोडून जायला सांगायचे. त्यामुळे दर ४-५ महिन्याने दयाल आणि सरिताला आपलं घर बदलावं लागायचं.
चांदनी ५ वर्षांची झाल्यावर दयाल आणि सरिताच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या मुलासाठी दोघांकडे भुंगा सुरु केला. दयाल आणि सरिताला हि वाटायचं कि त्यांना आणखी एक बाळ असावं पण ते हि जर मंदबुद्धीच निपजलं तर ? पण यावर दोघांनी तोडगा काढला की जर दुसरं बाळ ही असंच झालं तर एका ऐवजी दोघांना सांभाळावं लागेल, इतकंच. पण जर ते सामान्य असेल तर ! म्हणून दोघांनी दुसऱ्या बाळाला जन्म देण्याचा विचार केला. चांदनीची औषधं हि आता वेळेवर दिली जात असल्यामुळे तिचा हिंस्त्रपणाचा स्तर कमी झाला होता आणि आता २ दिवसातून एकदा वरून आठवड्यातून एकदा वर हा स्तर आला होता.
साल २०१० मध्ये सरिताने कुणालला जन्म दिला. पुढील एक वर्षामध्ये समजलं कि कुणाल सामान्य बाळ आहे. दयाल आणि सरिता खूप आनंदी आणि त्याच्यासाठी आशावादी होते.
२० डिसेंबर २०१२ रोजी आपल्या कामावरून घरी परतत असताना दयालने एक मूक मोर्चा पहिला. त्या मोर्चेकऱ्यांच्या हातात ‘बलात्काऱ्यांना फाशी द्या’ अशा प्रकारच्या घोषणा लिहिलेले फलक होते. दयालने तेथील एका माणसाला विचारलं तेंव्हा कळलं कि दिल्लीत एका मुलीवर भयंकर बलात्कार झाला आणि त्यात तिचा मृत्यू ही झाला, त्याच्या विरोधात सर्व देशातून निषेध व्यक्त होतो आहे. दयाल घरी आला आणि सुन्न होऊन बसला, चांदनीकडे टक लावून पहात होता. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरु होतं. काही दिवसांत दिल्लीतील त्या मुलीला लोक ‘निर्भया’ म्हणू लागले होते. त्यानंतर मोर्चे, चर्चासत्र, मुलींचे सबलीकरण, मुलांना योग्य शिकवण देणं वगैरे गोष्टींवर चर्चा होऊ लागल्या. जिकडे जावं तिकडे लोक याच विषयावर बोलायची, दयालला ते सर्व असह्य व्हायचं.
साल २०१६ मध्ये चांदनी १२ वर्षांची झाली होती आणि कुणाल ६ वर्षांचा होता. चांदनी जसजशी मोठी होत गेली तसतशी ती औषधांना हि जुमेनाशी झाली. मग सरिता लोकांच्या सांगण्यावरून देवदेवस्की करू लागली. त्याने काय फरक पडणार होता, पैसा मात्र पाण्यासारखा वाहून जात होता. त्यातच एक दिवस सरिता घरात आपल्या कामात गढलेली असताना चांदनीला अटॅक आला आणि तिने समोर खेळत असलेल्या कुणाल वरच आपला राग काढायला सुरुवात केली. तिने लहानग्या कुणालचे केस पकडून त्याला भिंतीवर आपटू लागली, त्याच्या किंचाळण्याने हि तिला फरक पडत नव्हता. सरिता कुणालच्या आवाजाने बाहेर आली आणि तिने कसबसं चांदनीच्या तावडीतून कुणालला सोडवलं. तिला एका खोलीमध्ये बंद केलं आणि कुणालकडे धावली तर त्याच्या डोक्यातून रक्ताची धार लागली होती. शेजाऱ्यांच्या मदतीने तिने दयालला फोन करून बोलावून घेतलं आणि कुणालला रुग्णालयात नेऊन त्याच्या वर उपचार सुरु केले. ह्या प्रसंगानंतर दयाल आणि सरिता हतबल झाले. कुणालवर चांदनीने केलेल्या हल्ल्याने त्यांना कुणालची काळजी वाटू लागली होती आणि चांदनीची भीती. कुणाल हि त्यांची एकमेव आशा होती, त्याला ते चांदनीच्या हिंस्त्रपणात गमावू शकत नव्हते.
कुणाल वर उपचार झाल्यानंतर दयाल आणि सरिता त्याला घेऊन घरी आले. चांदनीला बंद करून ठेवलेल्या खोलीचं दार दयालने उघडलं आणि आपल्या लालभडक, कठोर डोळ्यांनी तो चांदनीकडे पाहू लागला. त्याच्या डोक्यात उठलेली वावटळ त्याच्या डोळ्यातून लाव्ह्यासारखी वाहत होती. सरिता एका कोनाड्यात कुणालला पोटाशी कवटाळून बसली होती आणि आपल्या नशिबाला नावं ठेवत मुसमुसत होती.
दयालचं डोकं विचारांनी भंडावून गेलं होतं. “चांदनीने आज कुणालचा जीव घेतला असता तर ? काय करू तिचं ? तिला कुठे सोडून आलो आणि उद्या तिच्यावर अतिप्रसंग झाला तर ! तिला कळणार तरी आहे का की तिच्या सोबत काय झालंय ते! मुलींच्या आश्रमात सुद्धा मुली गरोदर राहिल्याच्या बातम्या येतात. त्यांच्या सोबत किती घृणास्पद वर्तन होत असेल कुणास ठाऊक! ते आश्रम ही सुरक्षित नाहीत. कुठे ठेवावं तिला, कुठे टाकावं तिला? परी म्हणून जिला लहानपणी खेळवलं ती आता राक्षसी झाली होती. काय करावं??? असंच जपावं तर तिच्या अटॅकचा नेम नाही. आई बाप किती दिवस पुरणार? नकळत कुणाच्या ताब्यात सापडली तर ? वासनेने अंध झालेल्या लोकांत ती आपला तग कसा धरेल? वासनांध माणूस मुलगी पहात नाहीत कि म्हातारी कोतारी, या लोकात चांदनी जगेल कशी ? कुणाल मोठा झाल्यावर त्याला हि नाईलाजाने आपल्या बहिणीची देखभाल करावी लागणार, त्याला त्याचं करिअर घडवता येणार नाही, त्याचा बिचाऱ्याचा काय दोष!”
पण करू काहीतरी म्हणून त्याने मडक्यातलं घोटभर पाणी घशात ओतलं, थोडा धीर वाटला. सरिताच्या पुढ्यात एक ग्लास पाणी ठेवलं. ती दयाल कडे पहात होती. त्याची तगमग बघून तिची तहानही आटली होती. जरासा विरंगुळा म्हणून दयालने टीवी सुरु केला तर अल्पवयीन मुलींना नेपाळला घेऊन जाणाऱ्या रॅकेटला पोलिसांनी पकडल्याची बातमी सुरु होती. दयालने डोक्यावर हात मारला आणि टीवी बंद केला. विचारचक्र पुन्हा सुरु झालं, “जे पकडले गेले त्यांची बातमी झाली आणि पळून जाण्यात यशस्वी झाले त्या लोकांचं काय ? त्यांनी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलींचं काय? आणि ज्या मुलींची सुटका झाली त्या मुली आई वडिलांकडे परत पाठवल्या जातात कि आणखी कुठे ? जिथे पाठवले जातात तिथल्या मुलींचं आयुष्य कसं असतं ? त्या गरोदर कशा होतात ? लहान सुजाण मुलींना जिथे बलात्काराचा अर्थ कळत नाही तिथे चांदनीसारख्या मुलींना काय कळणार ?”
दयालच्या मेंदूतील वादळ थांबण्याचं नाव घेत नव्हतं. आणि अखेर ते एक निर्णय घेऊन थांबलं..... चांदनीचा खात्मा करायचा. त्याने सरिताला आपला निर्णय सांगितला. सरिताने स्पष्ट नकार दिला पण ती ही “हो... नाही” म्हणता म्हणता यासाठी तयार झाली. कोलगावात जाऊन चांदनीला मारण्याचं निश्चित केलं.
दयालने मंशारामला यात सहभागी करून घेण्याचं ठरवलं. सरिताने दयालला सांगितलं कि, “आशाचा मुलगा सुभाष हुशार आहे, त्याला कळेल की ते काहीतरी कांड करणार आहेत, मग काय करायचं?” दयालने यावर तोडगा काढला. कोलगावात गेल्यावर त्याने सुभाषला फोन करून हे निश्चित केलं कि सुभाष एवढ्यात कोलगावात परतणार नाहीये. ४ दिवस तिथे राहून दयालने मंशारामचं मन वळवलं आणि २८ एप्रिल २०१६ रोजी मंशारामला खूप दारू पाजली. मंशारामच्या हातात त्याने फावडा दिला. रात्री २ वाजता त्याने झोपलेल्या सरिताला उठवून चांदनीला घेऊन जात असल्याचं सांगितलं. सरिताने होकार दिला आणि दयालने झोपेत असलेल्या चांदनीला उचललं. तो मंशारामसह तिला ब्रिज गोंडच्या पडीक शेतात घेऊन आला आणि तिला जमिनीवर ठेवलं. चांदनीच्या गळ्यातील नायलॉनच्या स्टोलने तिचा गळा आवळला. ती मृत झाल्याचे निश्चित केल्यावर मंशाराम कडून फावडा घेऊन जमीन उकरली आणि त्यात चांदनीचा मृतदेह पुरला. परत घरी आला तेंव्हा सरिता निघण्याच्या तयारीत बसली होती. दयाल सरिता आणि कुणालला घेऊन मंशारामच्या घरून निघाला. इंदोरला जायला गाडी मिळेलच याची शाश्वती नव्हती तरीही तो निघाला. पण एक ट्रक मिळाला जो इंदोरच्या दिशेने चालला होता. त्या ट्रक मध्ये बसून दयाल, सरिता आणि कुणाल इंदोरला पोहोचले. दुसऱ्या घराची व्यवस्था त्याने आधीच केली होती त्यामुळे चांदनीच्या गायब होण्याविषयी कोणाला काही कळलंच नाही.
दयालची साक्ष नोंदवून घेतल्यावर पोलिसांनी इंदोरहून सरिताला ही अटक केलं. दयाल वर्मन, सरिता वर्मन आणि मंशाराम गोंड यांच्यावर चांदनी वर्मनच्या खुनाच्या गुन्ह्यात भा.दं.वि. कलम ३०२ (हत्या), २०१ (पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे) आणि ३४ (समान हेतूने गुन्हा करणे) अन्वये खटला दाखल केला. मंशारामच्या घरून तो फावडाही हस्तगत केला. कुणाल आता आशा सोबत रहात आहे. आता दयाल आणि सरिता कारागृहात बसून विचार करत आहेत की त्यांनी केलेल्या गुन्ह्याची सर्वात मोठी शिक्षा तर कुणालला झाली आहे. आपल्याच मुलीला मारणाऱ्या आई वडिलांचा मुलगा म्हणून लोक त्याला जगू देतील का ? यासोबतच पोलीसही संभ्रमात आहेत की सर्वात शेवटच्या व्यक्तीला सुद्धा संरक्षण मिळेल इतकी आपली यंत्रणा सक्षम आहे का ?
समाप्त
0 Comments
Post a Comment