जेनी जोराने किंचाळली. तिची ममा तिच्या रूमपर्यंत येईतो जेनीचे हुंदकेही ऐकू येऊ लागले. जेनीजवळ पोहोचल्यावर तेच नेहमीचं दृश्य तिने पाहिलं, जेनी उशीत डोकं खुपसून हमसून हमसून रडत होती आणि उशीच्या बाजूला सुमितची डायरी पडली होती. गेली २ वर्ष हेच दृश्य जेनीचं कुटुंब पहात होतं. डॉक्टर्स, वैद्य, मानसशास्त्रज्ञ, प्रार्थना सर्व करून झालं पण जेनी काही केल्या अपराधाच्या भावनेतून बाहेर येत नव्हती. सुमितला बाईक भरधाव चालवू नको म्हणत असताना हि तिने त्याचं काही ऐकलं नाही आणि एका खांबाला जेनीची बाईक धडकली, हा अपघात एवढा मोठा होता कि सुमितला आपला जीव गमवावा लागला आणि यासाठी जेनी स्वत:ला दोषी मानत होती, या अपराधीपणाच्या कोषात जगत होती. बाहेरच्या जगाशी तिची नाळच जणू तुटली होती.
सुमितच्या डायरीत लिहिलेलं त्याच्या आईवडिलांच्या अपघाती मृत्यूचं वर्णन आणि मागाहून केवळ तिच्या हट्टामुळे सुमितचा झालेला भयानक अंत या दोन्ही गोष्टी तिच्या नजरेसमोर अवतरीत झाल्या कि ती सैरभैर होत असे. सुमितच्या मृत्युनंतर सुरुवातीचा काही काळ ती अशी सैरभैर झाली कि हातात जे मिळेल त्याने स्वत:च्या डोक्यावर आपटून घेई. अलीकडे मानसोपाचाराने हे बऱ्यापैकी कमी झालं होतं. जेनीच्या कुटुंबियांना तेवढाच दिलासा मिळाला होता कि जेनी आता लवकरच सामान्य होईल. डायरी वाचून जेनी परत त्याच कोषात जाते म्हणून एक दिवस ममाने मुद्दाम सुमितची डायरी लपवून ठेवली. पण तेंव्हा डायरी काढून देण्यासाठी जेनीने घरात हैदोस घातला. शेवटी जेनी डायरीसाठी अधिक वॉयलंट होऊ नये म्हणून ममाने तिला डायरी दिली. जेनीने ममाला तेंव्हा ताकीद दिली कि, ‘खबरदार पुन्हा डायरीला हात जरी लावलास तर...’ बिचारी ममा. तिने डॉक्टरांना हे सांगितलं, तेंव्हा डॉक्टरांनी हि तिला सांगितलं कि डायरी लपवू नका. ती डायरी समोर नसताना नॉर्मल राहील पण डायरी समोर असताना, ती वाचल्यानंतरहि ती नॉर्मलच राहील यावर आपल्याला इलाज करायचा आहे. ममाला हे पटलं आणि तिने पुन्हा कधीही सुमितची डायरी लपवून ठेवली नाही.
सुमितच्या मृत्यूला ३-४ महिने झाले असतील, जेनी अजून त्या धक्क्यातून सावरली नव्हती, घरीच असायची. कधी तरी ममा सोबत बाहेर पडायची. एक दिवस जेंव्हा जेनी आणि ममा मार्केट मधून घरी परतत होत्या तेंव्हा एक तरुण आपल्या बाईक वरून सुसाट वेगाने निघून गेला. जेनी त्यावेळी कानावर हात ठेऊन मटकन रस्त्यातच बसली. ममाला हे विचित्र वाटलं. नंतर एक दिवस तिचा भाऊ कार्लोस त्याच्या मित्राची सहीमची वाट पहात होता. सहीम त्याच्या एन्फिल्ड वरून आला तोच गगनभेदी फायरिंग करीत. कार्लोस बाहेर बाहेर जाऊन साहिमच्या नव्या कोऱ्या एन्फिल्डची तारीफ करीत त्याच्या मागे बसत होता तेवढ्यात जेनी पिसाटल्या सारखी ‘थांब थांब’ म्हणत बाहेर आली आणि कार्लोसला बाईक वरून खेचू लागली, ‘बाईकवर बसू नकोस’ म्हणून ती त्याला सांगत होती. कार्लोस आणि सहीमला काही कळलंच नाही. कार्लोस बाईक वरून उतरला तसा ती सहीमला तिथून जाण्यासाठी सांगू लागली, सहीम जाताना पण एन्फिल्डची फायरिंग झालीच आणि त्या आवाजाने जेनी परत कानावर हात ठेऊन जमिनीवर बसली. गोंधळ ऐकून ममा बाहेर आली तर केस पिंजारलेली, घाबरलेली, बावरलेली जेनी तिला दिसली, कार्लोसने तिला कसंबसं जमिनीवरून उचललं आणि तिच्या रुममध्ये नेलं. यानंतरही अशा घटना घडल्या आणि डॉक्टरनी आपला निष्कर्ष सांगितला, जेनीला ‘बाईक फोबिया’ आहे.
जेनी घरातून बाहेर न
पडण्या मागचं मूळ कारण हे होतं आणि गेली २ वर्ष ती ह्या बाईक फोबियात जगतेय.
२७ जुलै २०१७ ची सकाळी ९ वाजण्याची वेळ. जेनी खिडकीत बसून कामधंद्याला निघालेल्या लोकांची वर्दळ बघत होती. तेवढ्यात सहीम येताना दिसला, एन्फिल्ड वरून. तिने खिडकीचा पडदा लावून घेतला. पुसट आवाजात तिने ऐकलं कि कार्लोस अजून तयार नाहीये, सहीमने थोडा वेळ थांबावं नाहीतर निघून जावं. सहीम म्हणाला कि तो आता थांबत नाही कारण तो आणि कार्लोस दोघेही ऑफिसला उशिरा पोहोचले तर बॉस तापेल. कार्लोस ठीक आहे म्हणाला आणि सहीमने बाईकला किक मारली. बाईकच्या किकसोबत आणखी एक प्रचंड आवाज झाला. जेनीने काय झालं म्हणून पाहायला पडदा उघडला तर तिच्या वस्ती समोरची सिद्धी छाया इमारत पत्त्याच्या इमारतीसारखी कोसळत होती. ममा बाहेर आली, सहीम बघत बसला. कार्लोस बाथरूम मधून टॉवेल वर निघाला आणि जेनी हि दारात आली.
सहीमने बाईक स्टार्ट
केलीच होती त्याने बाईक सुरु केली आणि तो सिद्धी छायाच्या दिशेने गेला. कार्लोस ने
त्याला हाका मारल्या पण सहीम सुसाट निघाला आणि त्याच्या मागे जेनी त्या दिशेने पळत
सुटली.
स्थानिक लोकांचा
हलकल्लोळ माजला, किती
लोक आत अडकले असतील कोणाला काही अंदाज नव्हता. पोलीस आणि महानगरपालिकेला फोन गेले.
काही वेळात पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी तिथे आले. फायर ब्रिगेड आली,
रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले. लोक पोलिसांना आणि फायर
ब्रिगेडला मदत करू लागले. सहीमने हि एका प्लास्टर खाली दबलेल्या माणसाला बाहेर
काढलं. फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्याने त्याला सांगितलं कि त्या माणसाला लगेच
हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. पण २ अम्ब्युलंस आणि ४ स्ट्रेचर एवढ्याच व्यवस्थेवर किती
लोकांना प्रथमोपचार मिळणार होते ? पोलिसांनी आणखी कुमक मागवली होती पण ती मिळेपर्यंत जखमींना
तशाच अवस्थेत ठेवावे लागणार होते. सहीम आणि जेनी हतबल झाल्यासारखे पहात होते. सहीमने
ज्या माणसाला बाहेर काढलं होतं, त्या माणसाचं वजन जास्त होतं, त्याला सहीमने कसंबसं आपल्या एन्फिल्ड वर बसवलं आणि तो
त्याला एका हाताने सावरत स्टीअरिंग पकडण्याचा प्रयत्न करत होता. त्याला ते जमत
नव्हतं. त्याने जेनीला हाक मारली आणि म्हणाला, ‘Jeni, let’s take
this man to the hospital, just help me and drive the bike, hurry up.’ जेनीने मागचा पुढचा विचार नाही केला आणि तिने स्टीअरिंग
हातात घेतलं आणि बाईक वर स्वर झाली. सहीम त्या माणसाला पकडून मागे बसला. जेनीने
किक दिली आणि बाईक स्टार्ट केली ती थेट हॉस्पिटलच्या दारात उभी केली. त्या माणसाला
अपघात विभागात दाखल केलं जिथे आधीच त्या इमारतीतील लोकांना भरती केलं होतं. जेनी
आणि सहीम परत अपघाताच्या ठिकाणी आले तेंव्हा कार्लोसही तिथे आला होता. त्याने
पाहिलं कि जेनी रेस्क्यू करताना आपला फोबिया विसरली आहे. तो लोकांना ढिगाऱ्यातून
बाहेर काढणाऱ्या फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना मदत करीत होता आणि लांबून जेनीला
पहात होता. जेनी बाईक वर बसून होती तेंव्हा सहीमने एका बाईला उचलून आणली आणि
दोघांच्या मध्ये बसवली. तो मागे बसला आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन भरती केलं. नंतर
एका मुलाला, एका
आजीला,
बिल्डींगच्या वॉचमनला अशा एकूण ८ मोठ्या लोकांना आणि ३
मुलांना सहीम आणि जेनीने हॉस्पिटलमध्ये भरती केलं.
या इमारतीत एकूण २०
कुटुंब रहात होती म्हणजे किमान १०० रहिवासी या अपघाताच्या कचाट्यात सापडले होते
यातील एकूण १७ लोक मृत्युमुखी पडले. पण ११ लोक जेनी आणि सहीमच्या प्रयासाने वाचले.
या अपघाताची शाहनिशा करताना पोलीस आयुक्तांनी या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये त्यांना मदत
केलेल्या सर्वांचे आभार मानले त्यात जेनी आणि सहीमचे विशेष आभार मानताना म्हणाले
कि या दोघांनी जर समयसूचकता दाखवली नसती तर कदाचित मृतांची संख्या वाढली असती.
ममा आणि डॅडीना जेंव्हा कार्लोसने जेनीच्या पराक्रमाविषयी सांगितलं तेंव्हा त्यांना विश्वासच बसत नव्हता. जेनी घरी आली तेंव्हा दोघांनी तिला घट्ट मिठी मारली आणि डॅडी तिला म्हणाले, ‘Welcome back my
little angel….’
0 Comments
Post a Comment