आपल्या म्हाताऱ्या, फेंगड्या पायांना न पेलवणारं सामान डोक्यावरच्या टोपलीतून वाहत होती. नवर्याने टाकलेल्या लेकीला घरी परत घेऊन जावं तशा आज बाजारात विकल्या न गेलेल्या भाज्या ती घरी घेऊन जात होती. त्यांच्यावर पाणी मारून स्वत:प्रमाणे त्यानाही जिवंत ठेवण्याचा आटापिटा करत ट्रेनची वाट पाहत उभी होती. तिने इंडिकेटर पहिलं आणि निवांत व्हायला किती अवकाश आहे त्याचा अंदाज घेतला. स्टेशनवर दुपारच्या उन्हाचा तडाखा बसणार नाही अशा पत्र्याच्या सावलीत प्रवासी बसले होते प्रत्येक जण तिला अधनं मधनं न्याहाळत होता. एकमेकांशी कुजबुजत होता. चुचकरत होता. दुपारभर बाजारात बसून म्हातारीची खारीक झालेली बघून ते हळहळत हतोए. सगळेच तिच्या सुरकुत्या मोजून आयुष्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होते. सेलिब्रेटीज ना सुद्धा एवढं कोणी न्याहाळणार नाही. पण ह्या पाहण्यात विलक्षण आपलेपणा होता, दया होती, सहानुभूती होती. आपल्याला काही करता आलं असतं तर किती बरं झालं असतं असे भाव प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर होते. पण आपण काहीच करू शकत नाही म्हणून प्रत्येक जण नजर दुसरीकडे वळवत होता.
पण ‘तो’ तिच्याकडे आत्मीयतेने बघत होता. त्याला तसं बघताना पाहून ती त्याला म्हणाली, ‘ए दादा, जरा हात लाव रं बाबा.’ त्याने क्षणाचाही विलंब न लावता तिची टोपली उतरवून दिली आणि आपसूकच विचारलं, ‘काय मावशे, कशाला उगीच उन्हाची निघालीस बाहेर?’ तर ती आपले पान आणि तंबाखूने काळवटलेले दात विचकत तिथे टोपलीपाशीच फतकल मांडत म्हणाली, ‘उन बघत घरात ऱ्हायले तर धंदा कसा व्हयाचा आन मंग खायाचं काय? हातापायांनी अजूनपत्तर सात दिली, फुडं पण जवर देतील तवर करीन. मंग बुलाव्याचीच वाट बगायची, काय!’ ते ऐकून त्याच्या मनात शल्य, अगतिकता, हतबलता अशा सगळ्या भावना दाटून आल्या! आपण सामान्य कामगार माणूस, काय करणार तिच्यासाठी! आपलंच आपल्याला फावत नाही. आपल्याच म्हातारा म्हातारीला सांभाळताना आपल्या नाकी नऊ येतात! कोणाकोणाला आपण पुरे पडणार ! आपणही एक दिवस असेच सुरकुतलेलं शरीर घेऊन बुलाव्याची वाट पाहणार. नाईलाजाने. मुलाबाळांच्या आणि नातवंडांच्या गराड्यात किंवा एकट्याने कुठेतरी... पाणावलेल्या डोळ्यांनी तो अगतिकतेने इंडिकेटर पाहून आपली ट्रेन यायला किती वेळ आहे याचा अंदाज घेऊ लागला. इलाज नाही.
0 Comments
Post a Comment