कधी नव्हे एवढे बोकाळलेपण आज चहुकडे दिसत आहे.
संवेदनशील मनाला औदासिन्य आले आहे. आत्मपरिक्षण करणाऱया प्रत्येकालाच मग तो समाजकारणात असो की राजकारणात `या सत्तेत जीव रमत नाही’ असं म्हटल्याखेरीज एकही दिवस जात नसेल. एवढी परिस्थिती कशी काय ढासळली ? आपण कुठेच का सुरक्षित नाही ? आपण सगळ्यांनाच का संशयाने पाहतो ? आपण कशानेच का आनंदी होत नाही ? आनंदाचे पर्याय म्हणून व्यसने का जवळ करतो ? आपल्याला कसलेच वैचरिक अधिष्ठान नाही का ? आपल्याला कोणीच खरोखरचा आयडॉल, आयकॉन नाही का ? मग आपण जयंत्या आणि पुण्यतिथ्या नेमक्या कोणाच्या आणि कशासाठी साजऱया करतो ? हे प्रश्न संवेदनशील मनाला पडले तरी उत्तरेही मिळतात ती ही की आपण या आयडॉल्सनी शत्रूंना कसं नामोहरम केलं तेच आपल्याला आजवर सांगितलं गेलं. त्यांनी केलेल्या राज्यव्यवहार, कायदे अंमलबजावणी, पीडितांचे उन्नयन सांगितलेच जात नाही. `प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर’ हे सिद्धांत ज्यांच्या कृतीतून प्रत्यक्षात आले त्या कृतींचा अभ्यास म्हणजे इतिहासाचा 60 मार्कांसाठीचा बोजड अभ्यास वाटतो आपल्याला. म्हणूनच तर दोन दिवसापूर्वीच्या घटना ही इतिहासजमा होतात ना आपल्यासाठी. महाराष्ट्रातील एकूण एक नेता आज ज्यांच्यावर सपशल राजकारण करीत आहे त्या शिवाजी महाराजांचाही असाच विसर पडला होता. रायगडावरची त्यांची समाधी महात्मा जोतिबा फुले यांनी शोधून काढली नसती, त्यांच जन्मेतिहास लिहिला नसता, त्यांच्यावर पोवाडा लिहिला नसता तर कोण हा शककर्ता असा प्रश्न आजच्या मुलांनी नक्कीच विचारला असता.
रयतेचा राजा असा लौकिक असणाऱया शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्यातील जुन्नर येथील शिवनेरी या गडावर झाला. आदिलशाही सल्तनत आणि मुघलांच्या अत्याचारी साम्राज्याविरोधात महाराजांनी मावळ प्रांतातील लढाऊ लोकांचे संघटन करुन त्यांचे सैन्य निर्माण केले. त्यांनी पायदळ, घोडदळ आणि आरमार अशा तिन्ही स्तरावरील सैन्याची अत्यंत शास्त्रशुद्ध रचना केली. त्यांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे सैनिक होते. लहानपणापासून सह्याद्रीच्या कडेकपारीत खेळण्यात आपले बालपण व्यतीत केलेल्या शिवरायांना गनिमी कावा चांगलाच अवगत होता. त्यांच्या सोबतचे अत्यंत विश्वासू असे सरदारही त्यांच्याच प्रमाणे निष्णात होते. महाराजांनी एकंदर 360 किल्ले आपल्या सरदारांसह सर केले. जवळजवळ 20 किल्ले त्यांनी नव्याने बांधले. यात सिंधुदुर्गाचाही समावेश होता. या प्रत्येक गडावर सबनीस, हवालदार आणि सरनौबत अशा तीन/तीन सरदारांची त्यांनी नेमणूक केली. यामुळे यातील कोणीही एक लाच घेऊन परकीयांना मिळणे अशक्य होते. महाराष्ट्राला लाभलेल्या विस्तृत किनारपट्टीचे रक्षण होण्यासाठी महाराजांनी सशक्त आरामाराची निर्मिती केली. हे सर्व जलदुर्ग म्हणजे आजही महाराष्ट्राचा अनमोल ठेवा आहेत. महाराजांनी राज्याचा खजिनाही सतत वाढता रहावा पण त्यासाठी रयतेवर भार पडू नये अशी जकात योजना अंमलात आणली. यामुळेच ते जनतेच्या कल्याणाची सर्व कार्ये करु शकले. त्यांनी आपल्या प्रांतात अत्यंत कडक शासन लागू केले होते. त्यामुळे त्यांच्या राज्यात गुन्हे घडत नसत. महाराजांनी पाचपातशाहीविरोधात अनेक वेळा लढा दिला. याशिवाय त्यांना फ्रेंच आणि पोतुगिजांविरोधातही अनेक वेळा लढावे लागले. चाच्यांपासून समुद्र किनारपट्टीचे जतन करण्यासाठीच प्रामुख्याने आरमाराची निर्मिती त्यांनी केली. 6 जून 1674 रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती म्हणून विश्वविख्यात झाले. या राज्याभिषेकानंतर 12 दिवसांनी माँसाहेब जिजाऊसाहेबांचे निर्वाण झाले. वयाच्या 52 व्या वर्षी दि. 5 एप्रिल 1680 रोजी महाराजांचे निर्वाण झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र शंभूराजे आणि राजाराम यांनी स्वराज्याची धुरा वाहिली. महाराजांनी पादाक्रांत केलेलं राज्य 1818सालापर्यंत चालले.
`हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ’ हे महाराजांच्या बाबतीत तरी आज शक्य दिसत नसले तरी त्यांचा राज्यकारभार, सुरक्षा यंत्रणा आजही मार्गदर्शक ठरु शकतात. त्यांचा गनिमी कावा आज वेगळ्या संदर्भाने अंमलात आणता येऊ शकतो. `गोब्राम्हण प्रतिपालक, क्षत्रिय कुलावंतस’ अशी विशेषणे लाऊन त्यांना सिमित करण्याचा प्रयत्न यापुढे होणार नाही याची खबरदारी आपण घ्यायला हवी. म्हणूनच हा इतिहास, पुन्हा इतिहासजमा व्हायला नको.
0 Comments
Post a Comment