अवैध पद्धतीने किंवा अल्पवयात लग्न लागलेल्या किंवा होऊ घातलेल्या मुलींना दिलासा देणाऱ्या एका यंत्रणेची सुरुवात मँचेस्टर पोलिसांनी 11 नोव्हेंबर 2009 पासून केली
इंग्लंडमध्ये राहणाऱ्या अनेक अल्पवयीन मुलींना त्यांच्या आईवडिलांच्या जबरदस्तीला बळी पडून दुसऱ्या देशातील माणसाशी लग्न करायला भाग पाडले जात होते. यात मुस्लीम समाजातील मुली मोठ्या प्रमाणावर भरडल्या जात होत्या. त्यांची लग्ने पाकिस्तानातील किंवा अरबस्तानातील पुरुषांशी करुन दिली जात होती. ही लग्ने म्हणजे निव्वळ करार होता जो मुस्लीम समाजात धर्ममान्य आहे. पण इंग्लंडमध्ये होत असलेली लग्ने ही त्या कराराच्या पलिकडचा व्यवहार आहे. मुलीला तिच्या संमतीशिवाय तिचे लग्न लाऊन दिले जात होते. निकाहनाम्यानुसार केलेल्या कराराच्या नावावर आपल्याच मुलीची विक्री केली जाते. यातून दुहेरी फायदे साधले जातात. नवरा अर्थात तिला विकत घेणारा बरेचदा पाकिस्तान किंवा अरब देशातील असतो. तो निकाहानंतर त्या अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवतो. तिला यातून दिवस गेले की तिला तिच्या घरी इंग्लंडला पाठवून दिले जाते. यामुळे त्या तिच्या तथाकथित नवऱ्याला इंग्लंडला येण्यासाठीचा व्हिसा सहजासहजी मिळतो. त्याला आपल्या ह्या विकतच्या बायको आणि आपल्या मुलासोबत राहण्यात काही रस नसतो. मुलीला आधीच विकून त्याचे पैसे पचवून बसलेल्या आईवडीलांना ह्या माहेरी परतलेल्या मुलींना फुकटचं पोसावं लागतं. हे अंगाशी आलेलं झेंगट त्यांना नको असतं. म्हणून ते आपल्या मुलीचा छळ तर करतातच शिवाय तिच्या नवऱ्याने तिला पुन्हा पाकिस्तानात घेऊन जावे म्हणून नाना क्लृप्त्या करीत असतात. या मुली काही वयाने मोठ्या नसतात की त्या स्वत:चा आणि आपल्या मुलाचा सांभाळ करु शकतील. मग गुराढोरांसारखा मार खात, बोलणी खात त्या जगत राहतात. अशा मुलींना हुडकून त्यांच्यावर जबरदस्ती करणाऱ्या कुटुंबातील प्रत्येकावर कायद्याचा बडगा उगारुन त्या मुलीला संपूर्ण सुरक्षितता देणारी ही यंत्रणा मँचेस्टर पोलिसांनी उभारली आहे. मँचेस्टर पोलिसांच्या या योजनेचे अशाच पराकोटीच्या छळवादातून आपली आणि आपल्या मुलाची सुखरुप सुटका करुन घेणाऱ्या समीम अली हिने स्वागत केले आहे. मुस्लीम मुलींची ही अवस्था अनेकांना माहित होती पण समीम अलीने लिहिलेल्या `बिलाँगिंग' या आत्मकथनानंतर त्याची दाहकता अधिक जाणवली

बालपणी पहिल्या सहा वर्षात बोर्डिंगमधल्या वास्तव्यात अनुभवलेले शांत, प्रेमळ आणि तितकंच शिस्तबद्ध वातावरण हे समीमच्या स्मृतीपटलावरचे सोनेरी पान आहे. हे सर्व सोडून केवळ आपल्या आईसोबत आणि भावंडासोबत राहता येईल म्हणून ती इवलीशी पोरगी फार खुश होती. पण एखादा गुलाम विकत आणावा तसा तिचा घरातील कामात वापर केला गेला. प्रचंड मारले गेले. ती तोतरी बोलायची म्हणून सख्ख्या आईने पडजीभ ब्लेडने कापून टाकली. एवढं सगळं कमी होतं म्हणून 13 वर्षांची होताच तिचं पाकिस्तानात लग्न लाऊन दिलं. तीनच महिन्यात तिला दिवस गेले. मुलगा झाल्यावर तिला पाकिस्तानात पाठवण्याचा कट शिजवला. आताचा तिचा पती असगर याच्या मदतीने ती पळून मँचेस्टरला आली. मोठ्या भावाने तिला आणि तिच्या मुलास जिवंत किंवा मृत पकडण्यासाठी माणसं पाठवली. त्यांना संशयास्पद स्थितीत मँचेस्टर पोलिसांनी पकडलं म्हणून समीम सुखरुप राहिली. समीमच्या या धाडसी निर्णयामुळेच आज अनेक मुली कायद्याच्या संरक्षणात सुखरुप आहेत. एका असीम धैर्याची ही गोष्ट अनेकांसाठी प्रेरक ठरु शकेल. सिंधू जोशी यांनी केलेले याचे मराठी भाषांतर मेहता पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे.