भीमा कोरेगाव प्रकरणानंतर फार वाईट पद्धतीचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यांना आळा घालण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न केला पण काही उपद्व्यापी लोक आलेले संदेश विचार न करता पुढे पाठवत आहेत. सगळ्यांच्या संदेशा अखेरीस सौहार्द जपण्याची विनवणी असते पण या विनवणी आधी जेवढं जमेल तेवढं विष ओकण्याचं काम केलं जात आहे.
एक लहान मुलाचा विडियो भलताच व्हायरल झालाय. हा कशाप्रकारे खोटा विडियो आहे हे परोपरीने सांगून हि तो पुन्हा पुन्हा पाठवला जात आहे. दुसरा संदेश ‘बंद’ची व्याख्या सांगणारा. हि व्याख्या ज्या प्रकारे बनवली आहे त्यावरून संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या सर्वच संघटनांची आपण टर उडवतोय याची ही जाणीव या forward कर्त्यांना नसावी ? तिसरा संदेश आहे, “ना दलित जिंकले, ना मराठा ना ब्राम्हण. जिंकले फक्त इंग्रज. २०० वर्षानंतर हि फूट पाडण्यात यशस्वी.” हा संदेश पाठवणाऱ्याना सांगावसं वाटतं कि आंबेडकरी समाजातील लोकांवर हल्ला झाला. त्याची प्रतिक्रिया मुंबईत आणि महाराष्ट्रभर उमटली. यात कुठे आली फूट वगैरे? आंबेडकरी समाजाने आंदोलन केलं तर फूट ? मग खैरलांजी, उना, नितीन आगे आणि असे अनेक प्रकार घडत असताना आम्ही कसे सौहार्दाने राहू शकलो याचा कधी तपास केलाय?
२०१४ च्या निवडणुकीत झालेले सर्व विजय हे सोशल मीडियाचे विजय होते. आता सोशल मिडियावर ज्या गोष्टी व्हायरल केल्या जात आहेत हे पण त्याचाच प्रकार आहे हे समजायला रॉकेट सायन्स एवढं कठीण आहे का ? सोशल मीडियाचा आता तरी योग्य वापर करायला आपण शिकणार कि भडकाऊ गोष्टी पसरवण्यासाठीच सोशल मीडिया अस्तित्वात आलाय या संभ्रमात राहणार?
ही पोस्ट वाचून कोणाला वाटेल की आंबेडकरी समुदायाविरोधात सोशल मीडियावर गोष्टी आल्यामुळे मला वाईट वाटतंय, म्हणून मी हे सर्व लिहितेय. पण मी सांगू इच्छिते की
काही दिवसांपूर्वी माझ्या WhatsApp वरील एका गृप वर आरएसएस विषयी गरळ ओकणारा मेसेज आला होता. तो एका नॉन आंबेडकरी मैत्रिणीने forward केला होता. तिलाही मी गृप वर बजावलं की
असले मेसेजेस आले तरी आपण forward करू नयेत. काल सकाळीच मुस्लीम विरोधातील मेसेज होता. मी पाठवणाऱ्याला दटावलं.
मला एवढंच म्हणायचं आहे की
जे काही घडत आहे ते अत्यंत वाईट आहे. कोणालाच ते नकोय. पण ते आणखी चिघळू नये त्यासाठी आपणच काळजी घ्यायला नको का? जातीयता मुळापासून उपटून टाकण्याचा आमचा प्रयत्न असताना विनाकारण जातीय तेढ निर्माण झाली तर जाती विरहित राष्ट्र उभारणी किती कठीण होऊन जाईल याची कल्पना ही
करवत नाही.
ज्यांना कोणाला जिथे कुठे जाऊन नतमस्तक व्हायचं आहे ते होऊ द्या ना. आपणही शिर्डी, पंढरपूर, तुळजापूर, शनी शिंगणापूर इथे जाता. तसंच कोणी भीमा कोरगाव, चैत्यभूमी, दीक्षाभूमी इथे केवळ नतमस्तक व्हायला जात असतील तर कोणाला पोटशूळ का उठावा? तिथे कोण आलं, कोण गेलं ही
गैरलागू चर्चा सोशल मीडिया वर कशाला हवी? तुम्हाला ज्या गोष्टी खटकतात त्याची तुम्ही लोकशाही मार्गाने पोलीस स्टेशन आणि न्यायालयात तक्रार करू शकता. सोशल मीडियावर गरळ ओकून लोकांची डोकी भडकवून काय मिळतं? कृपा करून कोणतीही अ-सामाजिक गोष्ट जिथे दिसेल तिथेच थांबवा. अन्यथा तिने अक्राळविक्राळ रूप धारण केलं तर ते संदेश पाठवणारे ही
सुटणार नाहीत हे लक्षात घ्या.
0 Comments
Post a Comment