असा ही एक अनुभव
काल ट्रेन मधून प्रवास करतानाचा प्रसंग.
रविवार आणि ख्रिसमसची पूर्वसंध्या यामुळे ट्रेनला गर्दी नव्हती. मी मिरारोडला चढले आणि माझ्या सोबत आणखी दोघी चढल्या. माझ्या समोरच्या ८ सीटर वर थोड्या अंतरावर दोघीजणी बसल्या. त्यातील एकीच्या हातात रोझरी होती आणि ती तिच्या हरीचं नामस्मरण करत होती. नाम घेता घेता तिला ठसका लागला. ३-४ ठसके झाल्यानंतर दुसरी महिला आपली सॅक सरळ करू लागली. मला वाटलं कि ती आता सॅकमधून पाण्याची बॉटल काढून त्या बाईला देऊन म्हणेल, “थोडं पाणी घ्या, बरं वाटेल.” पण तिने तर सॅक नुसती सरळ करून ठेवली, माझी निराशा झाली. पहिली बाई पुन्हा खोकू लागली. तसं हि दुसरी पुन्हा सॅक चाचपडून निट करू लागली. यावेळी माझी खात्री झाली कि ती आता पाण्याची बाटली काढणार आणि तिला पाणी देणार. आणि झालं हि तसंच. त्या अडीच सेकंदात “माणुसकी, माणुसकी म्हणतात ती हीच” हे वाक्य माझ्या मन मस्तिष्कात कितीतरी वेळा निनादलं.... तिने सॅक मधून बाटली काढली, बाजूची बाई खोकत होती, माझ्या डोक्यातील घंटा आता अजस्त्र बनून निनादू लागल्या. तेवढ्यात ती आपल्या बाटलीचं झाकण उघडू लागली. माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसत नव्हता. माणुसकी इतक्या उच्च स्तराला पोहोचेल कि एक बाई दुसऱ्या बाईला चक्क बाटलीचं झाकण काढून पाणी देईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं ! माझ्या मनातील माणुसकीने परमोच्चांक गाठला आणि तेवढ्यात त्या बाईने उघडलेली ती बाटली सरळ आपल्याच तोंडाला लावली ??? सगळं मुसळ केरात ! माझ्या डोक्यात निनादणाऱ्या अजस्त्र घंटांना आपल्या सहस्त्र हातांनी कोणीतरी एकाच वेळी पकडून त्यांची मुस्कटदाबी करतंय असं मला क्षणभर वाटलं. बाईने तोंड लावून पाणी प्याल्यामुळे तिच्या “मालकीचं” ते पाणी ती दुसऱ्या कोणाला देईल हि आशाच निमाली. शेजारणीचा हरीनाम सप्ताह खोकत खोकत सुरु होता आणि मी माझ्याकडे पाण्याची बॉटल का नाही म्हणून आणि नकोत्या माणुसकीच्या गुंगीत कशाला राहिले म्हणून स्वत:लाच दोष देत बोरीवली स्टेशनात पायउतार झाले.
0 Comments
Post a Comment