स्त्रियांच्या बाजूने अनेक कायदे होत असताना स्त्रिया या सर्व बदलांसाठी तयार आहेत का हा प्रश्न पडावा असा देखावा आज ट्रेनमध्ये मी याची डोळा पाहियला. झालं असं कि, सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेतील 497 कलम रद्द करून समस्त भारतीय स्त्रियांच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय दिला या विषयीचं संपादकीय आज लोकसत्तेत 'ती जगातें उद्धारी' या शीर्षकाखाली छापून आलं. ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान मी ते वाचू लागले. ट्रेनमध्ये नेहमीच येणाऱ्या विक्रेत्यांप्रमाणे एक आजीबाई गुजरात आणि राजस्थानहून आणलेल्या बांधणीच्या साड्या घेऊन विकण्यासाठी आली होती. माझ्या समोरच्या बाकांवर बसलेल्या दोन बायका मग तिच्याकडच्या साड्या तिच्या पोतडीतून तिला उचकटायला लावून "आ कलर मा बीजी साडी नथी के ?" "आ डिझाईन मा लाल कलर देखाडो ने" असं म्हणत तिच्या पोतडीतून एक एक साडी बाहेर काढत होत्या. एखादी तरी साडी त्या घेतीलच या अपेक्षेने आजीबाई साड्या दाखवत होती. तेवढ्यात दोघींपैकी एकीला आठवलं कि श्राद्धपक्ष सुरु आहे, त्याच क्षणी दुसरीने अंगावर चढलेलं झुरळ झटकावं तसं आजीबाईला साड्या परत केल्या आणि म्हणाली, "श्राध चालू छे ने, याद आवी गई." आजीबाईने साड्या परत पोतडीत बांधल्या आणि पुढे येणाऱ्या स्टेशनची वाट पहात उभी राहिली. या पक्षात साड्यांची विक्री होणार नाही, मग चूल कशी पेटवायची असा विचार तर ती करत नसेल ना? तिच्या अर्ध्या तुटलेल्या चाफेकळी बोटाकडे माझं लक्ष गेलं आणि लोकसत्ताच्या त्या संपादकीयावर समुद्र दाटून आला! 
डोक्यात एकच प्रश्न घोंघावू लागला, बायका खरंच आपले विचार बदलतील का ?