'स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज' ही मालिका खरा इतिहास लोकांसमोर आणण्यात जितकी यशस्वी होत आहे तितकीच शिवाजी महाराजांचे विज्ञाननिष्ठ आणि कर्मकांड रहीत, रूढी परंपरा आणि समज याना न जुमानता माणसाला माणूस म्हणून वागवण्याचे विचार समोर आणण्यात ही यशस्वी ठरली आहे. परवाचा भाग हा महाराष्ट्रातीलच नाही तर सर्वच स्त्रियांसाठी एक वस्तुपाठ होता.
पन्हाळ्यावरून रायगडावर परत येणाऱ्या शंभूराजांचे औक्षण करण्यास उत्सुक असलेल्या पुतळा राणीसाहेबांच्या जेंव्हा लक्षात येतं की महाराजांच्या नंतर त्यांना  वैधव्य आलं आहे. आणि रितीनुसार त्या कोणालाही औक्षण करू शकत नाहीत. तेंव्हा त्या राणू अक्काना बोलावून त्यांना शंभू राजाचं औक्षण करायला सांगतात. तेंव्हा कणखर आणि निर्भीड शिवकन्या राणूआक्का पुतळा मातोश्रीना सांगतात की 'महाराजांची सहचारिणी असून तुम्ही शकुन अपशकुन मानता? महाराजांनी कधीही असल्या गोष्टी मानल्या नाहीत. तेंव्हा शंभुराजांचं औक्षण तुम्हीच करणार.' पुतळा मातोश्रीच्या 'रयत काय म्हणेल?' या प्रश्नाला राणूअक्का उत्तर देतात, 'रयतेला जे म्हणायचं ते म्हणू दे, पण औक्षण तुम्हीच करणार.'

घराघरात हळदी कुंकू घालताना विधवा स्त्रियांना आमंत्रण न देणाऱ्या आजच्या स्त्रिया शिवाजी महाराजांची ही शिकवण विसरल्या होत्या का?
महात्मा ज्योईबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे यापासून अगदी आजच्या  पुरोगामी विचारवंतांनी जाणीवपूर्वक विधवा संदर्भातील अनेक गोष्टीत आमूलाग्र बदल घडवून आणले असले तरी अजूनही स्थिती फारशी बदलेली नाही. शहरात याचं उग्र स्वरूप पाहायला मिळतं तर खेडोपाड्यात काय होत असेल याची कल्पना केलेलीच बारी.

विधवा स्त्रीला कोणतेच अधिकार दिले जात नाहीत.  अजूनही तिचा अपशकुन मानतात. अजूनही तिला क्षणोक्षणी उपेक्षेला सामोरं जावं लागतं. काल परवापर्यंत गावातील स्त्रिया शौचास शेतात जात. त्यांच्यासाठी फतवे असता की त्यांनी शौचास पहाटे किंवा रात्री जावं म्हणजे कोणाच्या नजरेस पडणार नाही. नैसर्गिक विधीसुद्धा गरजेच्या वेळी करण्याची मुभा त्यांना नाही. अशा वेळी कोणत्या तोंडाने आपण शिवाजी महाराजांचा वारसा सांगत सुटतो आहोत?
आधी डोक्यातून हा जातीभेदाचा, रूढी परंपरांचा, शकुन अपशकुनाचा मळ काढून टाका मग महाराजांचं नाव घ्या.
 'अशीच आमुची आई असती....' एवढीच महाराजांनी स्त्रियांची स्तुती नाही केली. तर सर्वच स्त्रियांना बरोबरीचे अधिकार दिले, शासन प्रशासनात सुद्धा त्यांना सामावून घेतलं. त्यांना नुसतं 'जाणता राजा' म्हणून चालणार नाही, तर ते जाणतेपण आपल्यात भिनवावं लागेल. हे जाणतेपण जेव्हा अंगी येईल तेंव्हा भेदभावाच्या सर्व भिंती गळून पडतील.
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिकेच्या सर्व टीमचे मन:पूर्वक धन्यवाद.
शिवभार्या पुतळा महाराणी साहेब आणि शिवकन्या राणूअक्का यांना शतश: नमन...