2 मार्च 2019
शनिवार

मीच मला भेटतेय असं वाटत असतानाच बोटांनी लिफ्टचं बटन दाबण्याचं कर्तव्य केलं आणि पुन्हा एकदा जमिनीवर येऊन रिक्षात शरीराला बसवून मी पुन्हा माझे तुकडे जमवायला सुरुवात केली.
सचिन वर्तक आणि परी तेलंगचा अभिनय अप्रतिम होता की किरण येले यांनी लिहिलं छान होतं, भीमराव मुंडेंनी दिग्दर्शन छान केलं होतं की भूषण तेलंग यांची संकल्पना उत्तम होती ह्याचा विचार आता लिहिताना डोक्यात येतोय.
मला माझी छवी दाखवण्यासाठीच कोणीतरी मुद्दाम 'बाई, अमिबा आणि स्टीलचा ग्लास' ह्या नाटकाचा घाट घातला होता की काय असं मला पहिल्या अंकापासून वाटत होतं, आता लिहिताना ही मेंदूत आलेला हा किडा जात नाहीये, चिकटून बसलाय, 'घोरपडी सारखा'.

सचिन वर्तक आणि परी तेलंगचा विविधांगी अभिनय 


नाटकाच्या पहिल्या अंकात 'बाई' या विषयावर सचिन आणि परी दोघेही बाईत्वाचा एक एक पदर केवळ टॅब वर वाचलेल्या संवादातून उलगडवून दाखवतात आणि माझ्यासारखी एखादी बाई आपलं ते शाब्दिक प्रतिबिंब पाहून अचंबित होऊ लागते.
बाईचा हळुवारपणा, प्रेमाची ओढ, नात्याची जपणूक, आपल्या आवडीला आणि निवडीला घुसमटवून टाकणं, स्वप्न बघणं आणि कामांच्या रगाड्यात ते विसरून जाणं ह्या आणि अशा अनेक बाईत्व सांगणाऱ्या गोष्टी फार अलवारपणे संवाद साधत सांगत शेवटी तूच तुला मुक्त करू शकतेस हे 'दार उघड बये आता दार उघड बये' च्या तालात जेंव्हा सचिन आणि परी सांगू लागतात तेंव्हा आत कसला तरी निर्णय आकार घेत असतो, काही तरी आत्म्याला पोषक असं शिजत असतं.
परी आणि सचिन पर्स मधल्या सर्व गोष्टींविषयी बोलताना आय कार्ड विषयी बोलतात तेंव्हा मी कॉलेजमधलं माझं आय कार्ड आठवू लागते, लग्नापूर्वीचं, ज्यावर माहेरचं नाव होतं. नंतर इतके आय कार्ड बनवले, अगदी आता आताचा मेट्रोचा पास सुद्धा. अर्थात त्यावर सुद्धा सासरचं नाव. माहेरचं नाव, ती पहिली ओळख कधीच आपण आपल्याला नव्याने करून दिली नाही. जगरहाटी आहेच पण खंतही आहेच की.
बाईत्व सांगून झाल्यावर 'अमिबा आणि स्टीलचा ग्लास' चा अंक तर या सगळ्याची परिणीती ठरतो.
'नातं अमिबा सारखं असावं, नात्याला जो आकार मिळेल तो आकार तिथेच सोडून पुढे जावं. नातं, प्रासंगिक आणि चिरंतन दोन्ही असावं.' परीचे हे शब्द ऐकून हायसं वाटलं. कारणं अनेक आहेत. पण कोणीतरी डोक्यावरचा बोजा उतरवावा असं वाटलं.

पुरुष ही हळवा होतो हे सचिनने बालपणी मैत्रिणीला पोएम बोलून दाखवणारा, शाळेतल्या सर्वात सुंदर बाईंना 'प्रेयसी सारखं' काहीतरी मानणारा, वयात आलेल्या आणि 'मोठ्या' झालेल्या बहिणीसोबत आता खेळू न शकणारा आणि आपण मोठा होतोय म्हणून आईच्या कुशीत ही शिरू न शकणारा मुलगा फार अप्रतिम रंगवला आहे. मुलांच्या सुद्धा व्यक्त होण्याच्या जागा हळू हळू कशा बंद होतात हे मला वाटतं पहिल्यांदाच रंगमंचावर आलंय.
शेवटी तो मुलगा व्यक्त व्हायला जातो कुठे तर एका वेश्येकडे. आणि जीवनाचं तत्वज्ञान अडाणी माणूस चपखलपणे सांगतो तसंच तीही सांगते.
'नातं काचेच्या ग्लासासारखं असावं स्टीलच्या ग्लासासारखं नाही.' असं ती सांगते तेंव्हा तुलाही तेच दिसलं पाहिजे जे मला दिसतंय. मला एक नि तुला भलतंच दिसतंय असं असू नये.' हे अगदी मनापासून पटतं. प्रासंगिक आणि चिरंतन हा नात्याला बघण्याचा दृष्टिकोन एकदा कळला की अनेक गोष्टी सोप्या होतात.
ह्या दोन रंगविष्कारांचं हे नाटक अशा अनेक बाबींचे गुंते सोडवतं तसंच ते विचार करायला ही लावतं. आपण आपल्याला भेटतोच पण त्या सोबत दुसऱ्यालाही भेटतो. हिंदीत एक म्हण आहे, 'बर्गद का पेंड, जहाँ से देखोगे वैसा दिखेगा'. हे नाटक ही तेच सांगतं पण अनेक जळमटं हटवत.
कितीही स्वत:ला भेटलो आणि आनंदी होऊन स्वत:साठी जगण्याचा प्रयत्न केला तरी जगरहाटी बदलत नाही. घरदार, नोकरी पाहावीच लागते. घरी परतताना एकच विचार मनात घोळत होता. बराच वेळ नाटक बघून स्वत:ची आवड जोपासण्यात घालवला त्यामुळे आता ऑफिसच्याया कामासाठी शनिवारची रात्र आणि अक्खा रविवार ओव्हर टाइम करावा लागणार. प्रबोधनकारच्या लिफ्ट मधून उतरताना घरचा कम्प्युटर आणि 'बये दार उघड' दोन्ही एकाच वेळी मेंदूच्या वेगवेगळ्या फ्रेममध्ये घुमत होते.
आता कामाला लागलं पाहिजे.
- विनिशा धामणकर
- 2 मार्च 2019
विंग कमांडर अभिनंदन वर्थमानची वैद्यकीय तपासणी दिन
(खास आनंद भंडारे स्टाइल)