बस झालं सतत तुझं असं खोचलेल्या बाणासारखं असणं
लहानपणापासून पाहत आलेय,
पदर निसटेल म्हणून सेफ्टी पिन
ओढणी निघेल म्हणून सेफ्टी पिन
चप्पल तुटली म्हणून सेफ्टी पिन
पर्स तुटली,
बटन निघालं, आहेच की सेफ्टी पिन
हातापायात काटा रुतला,
दातात काही अडकलं
काढा सेफ्टी पिन...
तत्काळ सेवा देणारी तू
तात्पुरतीच...
पण दारिद्र्य लपवलंस जगापासून
सुरक्षा, सेफ्टी दिलीस
म्हणून मम्मी सतत तुला जवळ ठेवायची
कधी बंगडीत तर कधी मंगळसूत्रात ओवायची
आपल्याला कधी हवी असेल तर
मम्मीच्या बांगड्यांवरून सहज
डोळे मिटून हात फिरवला तरी तू असायचीस,
आज हि जाणवतात तुझ्या दोन समांतर काड्या
मम्मीचा हात हवाहवासा वाटतो….
Hey hey hey… But I am not like that
I have some other facts
मी साडी नाही नेसत
नेसलीच तर बिनधास्त अर्धा पदर काढते,
इष्टाईलमध्ये हातावर घेते आणि सांभाळते
मी सलवार कमीज नाही घालत,
घातलाच तर जस्सी सारखं ओढणीच्या
दोन्ही बाजू जखडून नाही टाकत
मी चप्पल नाही, शूज वापरते
चप्पल वापरलीच आणि ती तुटली तर
बिनधास्त ती तुटकी चप्पल हातात घेऊन चालते.
मी रानावनात नाही भटकत
भटकलेच तर सरळ काट्यात हात घालते
टोचलेच काटे तर वाढलेल्या नखांनी काढून टाकते
आलंच रक्त तर चोखून घेते ड्रॅक्युलासारखी
दातात काही अडकलंच तर
टूथपिक वापरते नाही तर च्युईंग गम खाते
बांगड्या आणि मंगळसूत्र तर.... असो
मला वरवरच्या सुरक्षेची,
सेफ्टीची गरज उरली नाही
सो... डीअर पिन ओ पिन
तुझं टोकदार अस्तित्व हि
आता खोचून खोचून बोथट झालंय
मम्मीने लावलेली सवय म्हणून
पर्सच्या कोपऱ्यात टोचून ठेवलं फक्त
पण बघणारे हसतात गं आता
मेटलच्या रद्दीत तरी तुझी काय किंमत ?
सोडवत नाही गं
बोथट असलीस तरी
तुझ्या असण्यात सुद्धा आधार वाटतो यार
स्वैर असले तरी संस्कारांचे बंध तुटत नाहीत ना
ते हे असे
त्यात तुझा तर गुणधर्मच सांधण्याचा
दोन पिढ्यांना सांधलंस
मग... रहा बाई तशीच खोचलेली
हसणाऱ्यानाही कदाचित आई आठवत असेल.
भावना ओठावर येऊ न देणं
हि पण फ्याशन आहे ना आजची
तुझ्या असण्याने कदाचित कुठे तरी टोचेल
आणि भावनांचा फुगा फुटेल....
कदाचित डोळ्यातही खुपशील कुणाच्या
आठवणींच्या नद्या वाहतील....
सहज उघडझाप करताना बालपण येईल अंगात....
काळाच्या पडद्याआड इतक्या लगेच नाही जाणार तू
बोथट झालीस तरी आत्मा तुझाही टोकदारच राहिल
माझ्यासारखाच....
0 Comments
Post a Comment