ही जिवंत पक्ष्यांची धडपड
कुणी पंख तयांचे छाटले
मी करीता जगण्याची वणवण
ठिगळ्यांचे वल्कल फाटले....।।धृ।।
किती दूर असावे किनाऱ्याने
क्षितिजाची रेघच दिसते ही
आशेच्या वल्हव माऱ्याने
एक लाटच केवळ फुटते ही
कळवळले नावेचे शिडही
मग सागर हृदयी दाटले.....
मी करीता जगण्याची वणवण
ठिगळ्यांचे वल्कल फाटले....।।1।

ह्या पदोपदीच्या खळग्यांनी....
मुरगळले काळीज ज्यावेळी
कुरतडले सख्यही मुंगळ्यांनी
सणकून ती डसली ज्यावेळी
आक्रंदून उठली जी भडभड
निज निर्वाणाने गाठले...
मी करीता जगण्याची वणवण
ठिगळ्यांचे वल्कल फाटले....।।2।।