कधी कधी कठोर व्हावं लागतं
मैत्रीतही आई व्हावं लागतं....
नेहमीच पाठीशी उभी राहिल
जे काय असेल ते समजून घेईल
का करतेस म्हणून विचारणार नाही
सॉरी म्हणून मागे हटणार नाही
ह्या गृहीताला तोडावं लागतं
मैत्रीतही आई व्हावं लागतं....
दूर तू जाणार नाहीस
राग तू धरणार नाहीस
आगीतून फुफाट्यात पडणार नाहीस
खात्री आहे मला, तू हरणार नाहीस
पण लढणाऱ्यालाही एकटं सोडावं लागतं
मैत्रीतही आई व्हावं लागतं....
योग्य मार्गावर जा, तपस्वी हो
घडव तुझं आयुष्य, यशस्वी हो
तुझे सोहळे मलाही पाहू दे
तुझ्या कौतुकाने मलाही भारावू दे
भविष्यालाही असं जोजावावं लागतं
म्हणूनच कठोर व्हावं लागतं

मैत्रीतही आई व्हावं लागतं....