येत्या पाच ते सहा महिन्यात मीरा भाईंदर होणार फेरीवाला मुक्त – आयुक्त बालाजी खतगावकर
लोकसत्ता लाऊडस्पीकर या कार्यक्रमात आयुक्तांचे आश्वासन 


नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पोलिस उपअधीक्षक शांताराम वळवी, आयुक्त बालाजी खतगावकर आणि वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार 
“मीरा भाईंदर ही पूर्वी ग्राम पंचायत होती, नंतर ती नगर पालिका झाली आणि आता ती महानगरपालिका झाली आहे. मात्र इथे जो विकास आराखडा राबवला जात आहे तो नगर पालिकेच्या वेळचा आहे. काही ठिकाणी ट्राफिकचे नियम हे आजही ग्राम पंचायतच्या वेळचे आहेत. आज मीरा भाईंदरची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तेंव्हा तोच जुना आराखडा लागू होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही नागरिकांच्या मदतीने नवीन विकास आराखडा तयार करीत आहोत. त्यालाच उद्देशून मी सांगू शकतो की येत्या पाच ते सहा महिन्यात मीरा भाईंदर फेरीवाला मुक्त होईल.” लोकसत्ता लाऊडस्पीकर या उपक्रमा अंतर्गत “अनधिकृत फेरीवाले आणि वाहतूक कोंडी” या विषयावर शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2019 रोजी मीरा भाईंदर पश्चिमेच्या नगर भवन येथील दालनात पार पाडलेल्या कार्यक्रमात नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मीरा भाईंदर महानगर पालिकेचे आयुक्त बालाजी खतगावकर यांनी हे आश्वासन दिलं. नागरिकांशी संवाद साधण्यासाठी विचारपीठावर आयुक्त बालाजी खतगावकर यांच्यासह पोलिस अधीक्षक शांताराम वळवी आणि वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार हे ही उपस्थित होते.


मीरा भाईंदर मधील जवळपास 9 हजाराहून अधिक फेरीवाल्यांचं ऑनलाइन रजिस्ट्रेशन झालं आहे. आणि अजून प्रक्रिया सुरू आहे. शहरात 8 ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केलं जाईल आणि या रजिस्ट्रेशन नंतर येणार्‍या कोणत्याही फेरीवल्यास बेकायदेशीर ठरवून त्यावर कठोर कारवाई केली जाईल असं ही आयुक्तांनी पुढे सांगितलं.    
या कार्यक्रमाला मीरा भाईंदरच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आपले प्रश्न मान्यवरांना विचारले. वाहतूक कोंडीच्या प्रश्नांना उत्तरे देताना वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार म्हणाले की, “ह्या परिसरात अनधिकृत रिक्शा, हातगाड्या मोठ्या प्रमाणावर आहेत. आम्ही गेल्या वर्षभरात 700 बिना परमीट रिक्शा आणि 3016 हातगाड्या पकडल्या आहेत. यापुढे ही अशीच दंडात्मक कारवाई सुरू राहील.”
माजी आमदार मुजफ्फर हुसेन हे म्हणाले की, “मीरा भाईंदर हे सर्वाधिक स्थलांतरित लोकांचं शहर बनत चाललं आहे. त्यामुळे या शहरावर अधिक बोजा पडत आहे. यासाठी महानगरपालिकेने सीआरझेड साथी राखीव असलेल्या जागा कृपा करून रहिवासी जागा करू नयेत. कारण अशा जागा मोकळ्या झाल्या की तिथे बिल्डर येतात आणि मग वस्ती वाढते.” हुसेन यांनी महानगर पालिकेने नुकतंच 1600 एकर सीआरजेडची जागा रद्द केली हे नमूद केलं. याला उत्तर देताना आयुक्तांनी सांगितलं की, ती जागा शिक्षणासाठी राखीव आहे, त्यामुळे ती रहिवासी जागा होणार नाही यासाठी निश्चिंत असावं.
यावेळी नागरिकांनी विचारलेले प्रश्न असे होते : रस्त्यावर उभ्या करून ठेवलेल्या दुचाकी गाड्या टोइंग करून उचलून नेल्या जातात पण खरी अडचण चारचाकी गाड्यांमुळे होते. त्या सर्व टोइंग करून घेऊन जाणं शक्य नसलं तरी त्यांच्यावर त्या त्या जागेवरच कारवाई का होऊ शकत नाही? एकेका बाइक वर कधी 3 तर कधी 4 मुलं बसून नागरिकांना त्रास होईल इतक्या तुफान वेगाने चालवतात, ते आम्हाला दिसतात मग पोलिस कॉन्स्टेबलला दिसत नाहीत काय? वाहतूक कोंडी ही टेंडर घेऊन कामं देणार्‍यांमुळे होते. त्या टेंडर घेणार्‍यांवर कारवाई होणार की नाही? शाळांच्या वेळात मुलं आणि पालकांची मोठी गर्दी रस्त्यावर होते त्यामुळे या संवेदनशील वेळेत मोठी कोंडी होते, शाळांनी स्वत: मुलांना आणण्या-नेण्याची जबाबदारी घ्यावी त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही, यावर काही करणार का? मीरा भाईंदर हे 9 खाड्यांनी वेढलेलं शहर होतं, इथे मासेमारीसाठी खाड्यांमधून बोटी यायच्या, आता त्या सर्व खाडया बुजल्या आहेत, याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतोच शिवाय खाडया बुजवलेल्या ठिकाणी अनधिकृत वस्ती वाढते, यावर काही उपाय करणार का?      

   
मीरा भाईंदरच्या नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद 

उपरोक्त काही प्रश्नांना उत्तरे देताना मान्यवरांनी कारवाईचे काही दाखले दिले तर काही उपाययोजना ह्या आराखड्यात समाविष्ट करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाचं फलित काय हे जाणून घेण्यासाठी लोकसत्ता लाऊडस्पीकर पुन्हा काही महिन्यांनी असाच कार्यक्रम आयोजित करेल अशी ग्वाही कार्यक्रमाची सांगता करताना आयोजकांनी दिली.