तिला `तिच्या' ओघळत्या बटांमध्ये चंद्र दिसतो
यात `अनैसर्गिक' काय ?
त्याला `त्याच्या' उद्दाम आवेगात लुप्त व्हावेसे वाटते
यात `अनैसर्गिक' काय?
प्रेमाचे स्पर्श आधी की शब्द ?
शब्दांनी गोंजारलेल्याला
स्पर्शाने दूर करायचं?
का?
सिमिलर अट्रक्टस्
हा नियम तुमच्या ग्रंथांमध्ये नाही म्हणून?
तुमच्या लेखी सृजन फक्त एकच
नर आणि मादातून आणखी एक नर - मादी....
प्रेमातून प्रेमाचं आणि
स्पर्शातून अथांग होत गेलेल्या नेणीवेचं सृजन....
सृजन नाहीच मुळी...
ते अनैसर्गिक....
377 च्या पुंपणात अडकलेलं....
वंचितांच्या जमातींचा देश....
आणखी एक नवा वंचित घडवतोय....
सर्वोच्च न्यायालयात बसलेल्या नवब्राम्हणा,
तू आणखी एक नवमनुसंहिता लिहितोयस
मग एकदा काय त्या नैसर्गिक - अनैसर्गिकच्या
व्याख्या आणि मर्यादा ठरवून टाक
कारण तुला अजून
युज्वल, रेअर आणि रेअरेस्ट ऑफ द रेअरच्या
सीमारेषा ठरवायच्या आहेत....
0 Comments
Post a Comment