30 मार्च 2013 - महानायक
भयंकर उकाडा, पाण्याची वानवा, परीक्षांचा काळ आणि बेफाम महागाई या कशाचाही ज्या गोष्टीवर अजिबात परिणाम होत नाही तो सण म्हणजे होळी.
होळीमध्ये खरंच दुर्गुणांचा नाश होतो तर वर्षोनवर्ष हा सण साजरा करण्याची गरज काय ? पण दरवर्षी साठलेल्या दुर्गुणांना या दिवशी जाळलं जातं असं म्हटलं तर होळी ते सर्व दुर्गुण आपल्यात सामावून घेईपर्यंत जी काही तथाकथित सांस्कृतिक, बौद्धिक दिवाळखोरी दिसते आणि दुसऱयाच म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी माणसातील जनावराचं रूप सगळीकडे दिसतं त्याचं काय ? मुख्य म्हणजे एका स्त्री शक्तीला जाळण्याच्या या प्रथेला स्त्रियाच अधिक मनोभावे जिवंत ठेवत असल्याचं भयावह चित्र दरवर्षी याची `देही याची डोळा' पाहावं लागतं.
होलिका ही हिरण्यकश्यपू या राक्षस राजाची बहिण. ब्रम्हदेवाकडून तिला वरदानात एक शाल मिळाली होती. ती पांघरल्यास कसल्याही आगीपासून ती वाचू शकत होती. विष्णूचा भक्त असलेल्या आपल्या मुलाला मारून टाकण्याचे अनेक प्रयत्न करणारा हिरण्यकश्यपू होलिकेला सांगतो की, `तू प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्निकुंडात बस. तुझं तसंही रक्षण होईल, प्रल्हाद मात्र जळेल.' होलिका हळवी आहे, मातृहृदयी आहे. ती आपली शाल प्रल्हादाला पांघरायला देते आणि स्वतः अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडते. अशी ही कथा आहे. प्रल्हाद वाचला कसा, याच्या अनेक आख्यायिका आहेत. पण प्रल्हादाने विष्णूचे नामस्मरण केले म्हणून तो वाचला हि आख्यायिका अधिक लोकप्रिय आहे. होलिकेनेच प्रल्हादाला वाचवलं हे इथल्या स्त्रिया मानीत नाहीत, ही फार मोठी शोकांतिका आहे. तरीसुद्धा त्या राक्षस स्त्रीची पूजा त्या का करतात? का तिला जाळण्याआधी निर्भयता, अगम्य साहस, ऐश्वर्य, मुलाचं आयुरारोग्य मागणारे स्तोत्र गातात? की, हे स्तोत्र काय आहेत हेच त्यांना माहित नाही? होलिका हे एका स्त्रीचं `नाव' आहे, दुर्गुण जाळणारे माध्यम नव्हे ! वाहते ती नदी, जाळते ती आग, होलिका काही जाळत नाही ती स्वतःहून जळते. जिने स्वतः जळून आपल्या भाच्याला वाचवलं, तिला वर्षोनवर्ष जाळल्याने आपल्या मुलाचं संरक्षण खरंच झालंय का ? आपल्याला मुलाचं संरक्षण व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला होलिका बनावं लागेल, हे स्त्रियांना या सणाच्या निमित्ताने सांगितलं जात नाही. म्हणून त्या आपल्यासारख्याच एका स्त्रीला जाळत राहतात. खरंतर स्त्रियांना मुलांसाठी काबाडकष्ट घ्या म्हणून सांगण्याची गरज नसतेच. ती कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांना आपली शाल पांघरतेच. म्हणूनच होलिकेला जाळण्याची नाही तर तिच्या आदर्शाची पूजा व्हायला हवी. पण सीतेसकट सर्व `स्त्रियां'ना पुराणांमधून असेच नष्ट व्हावे लागले आहे. कधी भावनिक कथा देवांच्या तर कधी कुटील कथा राक्षसांच्या नावावर खपवून. या सगळ्यावरून या सर्व कथा या स्त्रीने करायच्या त्यागाचं, त्यांना नष्ट करण्याचं माध्यम म्हणून लिहिल्या गेल्या, हेच सिद्ध होतं.
सती प्रथा बंद झाली, वर्ष लोटली त्याला, पण होलिका जळते आहे. आडूनआडून सती जाते आहे. दरवर्षी.... नरबळी देत नाही त्याबदल्यात देवाला नारळ देतो म्हणण्यासारखं आहे हे. होलिका दहन हे सांकेतिक `सती' आहे असं नाही वाटत ? `सती' पुन्हा इथे रुजेल की काय अशी भीती वाटते ? कोणास ठाऊक ? ... होलिकेचं दहन थांबायला हवं !
शिशिर संपून वसंतात नव्या पालवीच्या आगमनासाठी शेतशिवार भाजणे म्हणजे खरंतर होळी. वसंत ऋतूमध्ये निसर्गाने उधळलेल्या रंगांचा उत्सव साजरा करण्यासाठी वसंत पंचमी येते. वसंतपंचमीला नव्या रुजवातीची तयारी केली जाते. वसंतपंचमीच्या ४० दिवसानंतर रंगपंचमी येते. या ४० दिवसात शेत शिवार भाजणीसाठी मोकळं करणं वगैरे कामं केली जातात. ४० दिवसानंतर होळी म्हणजे प्रत्यक्ष भाजणीचा काळ सुरु होतो. अशी हि शेतकरी परंपरा आहे. पण ह्या परंपरेचीच होळी करून त्याला विनाकारण राधा-कृष्णाच्या प्रेमाचा रंग दिला गेला आहे. ज्याचा होलिका दहनाशी दुरान्वयानेही संबंध नाही. या सर्व मूल गोष्टी लोकांना माहित नाहीत असं नाही. पण श्रद्धेचं बेगडी प्रदर्शन करायचं असेल तर सणावाराखेरीज दुसरं माध्यम नाही हेही त्या सणांच्या निर्मात्यांनी चांगलं जोखलं.
परवा होळ्या पेटलेल्या असताना फेरफटका मारताना लक्षात आलं की, दर 1 किलोमीटरमध्ये कमीत कमी 3 होळ्या पेटलेल्या आहेत. त्या सर्व होळ्या मोठ्या आवारात नाही तर अगदीच निमुळत्या जागेत जाळल्या जात होत्या. त्याच्यासमोर नारळ, लाह्या, पाणी, हळद, कुंकू, अबीर, दिवा आणि अगरबत्ती याचं ताट घेऊन, भांगात कोसभर लांब कुंकू भरलेल्या स्त्रिया डोक्यावरून मोठा पदर घेऊन रस्त्यावरच आपण किती श्रद्धावान आहोत याचे दाखले देत होत्या. दर ४००-५०० मीटरच्या अंतराने पेटणाऱया या होळ्यांचं चित्रण आकाशातून केलं तर आगींच्या गोळ्यांची रांगोळी दिसली असती किंवा अख्खी मुंबई आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यासारखी दिसेल. `एक गाव एक गणपती' सारखी `एक गाव एक होळी' अशी संकल्पना राबवणारं किमान परिवर्तन व्हायला नको का ? पण यालाही आणखी बराच वेळ लागेल, हे निश्चित.
आमच्या परिसरातील, कॉलनीतील होळी आम्ही करणारच या हेकेखोरी उर्फ गर्व उर्फ अहंभाव उर्फ अभिमान नावाच्या दुर्गुणाला होळी देखील जाळू शकत नाही. तिथे उरलेल्या दुर्गुणांचं काय ? दुर्गुण भले जाळले जातात पण त्यामुळे सुद्धा वातावरणातील कार्बनडायऑक्साईडच वाढतो हे आवाराआवारात ग्लोबल वॉर्मिंग वर मोठ-मोठ्या गप्पा मारणाऱयांना खरंच कळत नाही काय ?
यावर्षी (२०१३) पाण्याची वानवा असल्यामुळे रंगपंचमी पाण्याशिवाय खेळली जाण्याचं आवाहन सर्व थरातून केलं गेलं ही चांगली सुरुवात आहे. पण यात महाराष्ट्रात जिथे जिथे दुष्काळ आहे तिथल्या लोकांच्या दुःखात आपणही सामील आहोत असं सांगत कोरडी होळी खेळणाऱया मराठी कलाकारांची बेगडी सहानुभूती वृत्तवाहिन्यांवर बघून तर हसावं की रडावं, हेच कळत नव्हतं. पाण्याची रंगपंचमी खेळणार नाही पण रंग भरपूर माखवून घेणार, तेही पांढऱया कपड्यांवर आणि इमारतीच्या आवारात किंवा चित्रपटाच्या किंवा मालिकेच्या सेटवर. हे सगळं धुवायला काय चित्रपटातील ओलेत्या सीनप्रमाणे कृत्रिम पाऊस पडणार आहे काय ? कलाकारांचा हा बेगडी सजगपणा, समंजसपणा याचे गोडवे गाताना वृत्तवाहिन्याही थकत नव्हत्या.
आपण नेहमी कोणत्याही कारणासाठी सरकारला दोष देतो. ती आता सवयच झालीय म्हणा. पण याबाबतीत खरोखरच सरकारच जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांनी (तत्कालीन - पृथ्वीराज चव्हाण) भले पाण्याची नासाडी न करण्याचं आवाहन केलं तरी वर उपस्थित केलेले प्रश्न निर्माण होणार याची कल्पना नसेल का? मग दुष्काळग्रस्तांसाठी बेगडी सहानुभूती दाखवण्यापेक्षा सरळ कामकाजाचा दिवस म्हणून का जाहीर केलं नाही? रंगपंचमीच्या दिवशी सुट्टी घेऊन घरात गोडधोड करूनच लोक सण साजरा करतील अशी भाबडी आशा होती की काय सरकारातील अधिकाऱ्यांना? प्रत्यक्षात पाणी किती वापरलं गेलं याचं काही मोजमाप केलंय का ? पाण्याची पंचमी करणाऱयांना शिक्षेची तरतूद आहे काय ? धार्मिक बाबींवर बोलू नये अशी एक दहशत इथल्या लोकांवर आहे. पण या सगळ्याचा विचार सुशिक्षितांनी करायला नको का? अन्यथा ही हजारो वर्षांपासून चालत आलेली सांस्कृतिक फसवेगिरी अशीच अव्याहतपणे सुरु राहील.
0 Comments
Post a Comment