28 March 2014
सध्या वॉटस्अपसारखे ऍप्स आणि इतर सोशल
नेटवर्किंग साईट्सवर एक उखाणा मेसेजच्या स्वरुपात सगळीकडे फिरतो आहे. तो असा -
`पहिलं मतदान 17 ला,
लवकर पुसा शाई,
शरदरावांचं नाव घेते,
मला 24 तारखेची घाई.'
शरद पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास झाला
असं ते जरी कितीही म्हणत असले तरी सोडलेला तीर आणि बोललेला शब्द कधीही मागे फिरत नाही.
इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या तावडीत सापडल्यानंतर तर अजिबातच नाही. त्याचा रतीब दिवसरात्र
चालणार हे पहिल्या टेलेकास्टलाच नक्की झालेलं असतं. सामान्यांना माहित असतं की शरद
पवार म्हणजे मिश्कील फटाकेबाजीची लवंगी मिरची आहेत, त्यांचं बोलणं असं कितीसं मनावर
घ्यायचं ! पण प्रश्न सामान्य माणसांचा नाहीच मुळी. तो आहे नको नको त्या क्लृप्त्या
वापरुन आपल्या पारड्यात मते पाडून घेणाऱया कलागती उमेदवारांचा. स्वातंत्र्यापासूनच्या
60 वर्षांच्या काळात बोगस मतदानाने कळस गाठला होता. त्यातच मतदानाच्या वेळी बूथच फोडणे,
उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणे, गाडीभरुन मतदारांना घेऊन येणे किंवा आलेल्या
मतदात्याला धाकदपटशा दाखवून माघारी घालवून देणे हे प्रकार अव्याहतपणे सुरुच होते. किंबहुना
आहेत. `एक व्यक्ती एक मत' या तत्वानुसार बोगस मतदान रोखण्यासाठी चार दिवस कशानेही धुवून
न जाणारी शाई बोटावर लावली जात असते. मात्र शरद पवारांच्या `17ला साताऱयाला मतदान करा,
शाई पुसा आणि 24ला मुंबईला येऊन मतदान करा,' या वक्तव्याने अनेक शंकांना जन्म दिला
आहे.
काँग्रेसच्या विरोधात जनमत काही आज तयार
झालेले नाही. खुद्द संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की,
`काँग्रेस हे जळते घर आहे.' असे असतानाही काँग्रेसच अनेक वेळा सत्तास्थानी कसे काय
बसले ? त्यातही शरद पवार आपल्या राष्ट्रवादी नावाच्या फुटीर बाळाला मांडीवर घेऊनही
तख्तावर विराजमान झाले. हे कसं काय ? म्हणजे 17 आणि 24 चे जे इंगित पवारांनी मस्करीत
का होईना पण फोडले ते खरे आहे काय?
शाई ही अज्ञान दूर करणारे माध्यम आहे.
कोऱया पृष्ठभागावर काळ्या - निळ्या रेघा उमटल्या की अडाणी माणसांच्याही भावना पाहणाऱयाच्या
मेंदूपर्यंत पोहोचतात. पण आजकाल जसे सगळ्याच गोष्टीचे संदर्भ बदलले आहेत तसेच शाईचेही
संदर्भ बदलू लागले आहेत. आताच्या निवडणुकांच्या मोसमात तर शाईच्या (सु की कु)प्रसिद्धीने
उच्चांक गाठला आहे. सुब्रतो रॉय सारख्या लोक आणि शासन दोघांना 20 हजार कोटीचा चुना
लावणाऱया फ्रॉड व्यावसायिकाच्या चेहऱयावर त्याच्यावरील राग व्यक्त करण्यासाठी शाई फासली
गेली. तर अरविंद केजरीवाल यांच्या अंगावर अंड्यांचा वर्षाव झाल्यानंतर शाईचा वर्षाव
केला गेला. शाईच्या या अशा वापराचे कारण एकच असावे. दिर्घकाळ आपले अस्तित्व राखणारी
शाई धुवून निघून गेल्यानंतरही आपले निशाण मागे ठेवते. पण सुब्रतो रॉय काय किंवा केजरीवाल
काय त्यांच्यावर झालेल्या या `शाई'हल्ल्याने डगमगले ते नाहीत. कारण शेवटी `बोटावर शाई'
लावण्याच्या खेळात दोघेही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी आहेतच. गेंड्याच्या कातडीवर
शाई पडली काय नाही पडली काय एकच. आबाच मागे म्हणून गेलेत, `बडे बडे देशोंमें ऐसी छोटी
छोटी बाते होती रहती है।'
बोटावर पडलेला शाईचा तो एक थेंब मात्र
सत्ता उलटवू शकतो. तो एक थेंब `एकच' असू देणं हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्या
थेंबाचे महत्व फार आहे. त्याला कवडीमोल भावात विकून स्वतचीच फसगत कोणी करुन घेऊ नये.
आपल्या कायमस्वरुपी निवासस्थानी आणि कामाच्या ठिकाणी मतदान करु शकण्याची सोय ही घरापासून
दूर असणाऱया कर्मचारी, सैनिक आणि फिरतीच्या नोकरीवर असणाऱयांना आपला मतदानाचा अधिकार
मिळवण्यासाठी आहे. दोन्ही ठिकाणी मतदान करता येणे हे अद्ययावत तंत्रज्ञानामुळे तसेही
शक्य नाहीच पण ती भावना निर्माण होणे हा सुद्धा देशद्रोह नाही काय ? सामान्यांनाही
आतला आवाज असतो. त्याचे जरुर ऐकावे. राजकारणी लाख बोलतील पण अज्ञानासह सर्वच अंधार
दूर करणाऱया शाईचा सन्मान आपणच राखायला हवा. लोकशाही उभी आहे ती याच `शाई'वर हे लक्षात
असू द्यावे.
0 Comments
Post a Comment