5th December 2018


जमीन, मग ती शेतीची असो, जंगलाची असो कि गिरण्यांची असो, आपल्या खिशात घालता येत नाहीये असं दिसलं की तिला आग लावा म्हणजे ना रहेगा बांस न बजेगी बांसुरी... 
मग सावकाशीने लोकांना स्मृतिभ्रंश झाला की भाजकी, करपलेली, नापीक 
झालेली जमीन अलगद फुटाण्यांच्या भावाने विकत घ्यायची आणि उठवायच्या रिकाम्या बिल्डिंगी.... मग त्या भरण्यासाठी फेफरातून फेफरं सुटेपर्यंत झाइराती.... कि, “मुंबईचं दर्शन घ्या सोत्ताच्या बाल्कनीतून”... भरल्याच तर भरतात बिल्डिंगी आणि पेपरवाल्यांना काही नोटा सुटतात.... भले शाब्बास !  
मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून असल्या नापीक कल्पना अनेक पडीक डोक्यातून अधून मधून येत असतात. आणि मुंबईकर ही याला अगदी सरावले आहेत. अगदी “अ” ते “झ” पर्यंत त्यांना या कारस्थानाची बाराखडी माहित असते. कुठे आग लागली कि, ‘हम्म, कोणीतरी मुद्दाम काडी टाकली असणार,’ अशा प्रतिक्रिया हमखास उमटतात. पण हे वाईट वाटणं, चुकचुकणं, हताश होणं आणि “काय वाढून ठेवलंय भविष्यात, देव जाणे,” इतकी कोरडी प्रतिक्रिया देण्यापर्यंतच मुंबईकरांच्या विचारांची वेस संपते. इथेच आग लावणाऱ्याला मोकळं मैदान मिळतं आणि तो आपल्या कारस्थानात यशस्वी होतो. आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या शेत, जंगल आणि गिरण्यांच्या जागेवर आलिशान मॉल्स आणि स्काय स्क्रॅपर्स उभे राहतात. हे सर्व पर्यावरणाला तर अपाय करतातच पण सामान्य माणसाच्या जगण्यालाही कुंपण घालतात.   

काल आरे कॉलनीत लागलेल्या आगीची बातमी पाहिल्यानंतर माझी ही प्रतिक्रिया काही वेगळी नव्हती. पण यावेळी सरळ फुफ्फुसानांच लक्ष्य केल्यामुळे हृदय आणि मेंदू एकाच वेळी पेटून उठलेत. आजवर आम्ही आमच्या जमिनी अनेक विकासाच्या कामांसाठी दिल्या, किंबहुना इथल्या कसणाऱ्या आणि राबणाऱ्या माणसाच्या हातातून हिसकावून, बळकावून घेतल्या गेल्या. तिथे कोणाचा आणि कशा प्रकारचा विकास झाला यावर चर्चा करायची नाहीये. कारण तो विकास रोजच्या रोज सगळ्यांनाच संभ्रमात टाकतो आहे. अंधेरीच्या चकाला विभागात फिरताना साधा पत्ता विचारायला एक माणूस दिसत नाही आणि नजर जाईल तिथे काचेच्या इमारतींच्या चक्रव्युहात आपल्या भविष्याचा भेसूर चेहराच फक्त दिसतो तेंव्हा प्रश्न पडतोच, विकास माणसाचा झालाय की मशीनचा? माणसानेच बनवलेल्या वाघाने माणसाला खावून तर टाकलं नाही?.... असो.       

आरे कॉलोनीवर अनेक वर्षांपासून भकासकांची नजर होतीच आणि आता आरे करपून ही निघालं. पर्यावरण मंत्री रामदास कदमांनी कॅमेऱ्यासमोर सांगितलं, “ही आग कशी लागली याची सखोल चौकशी करू. ही आग लागली कि लावली याचा छडा लावला जाईल आणि यात कोणाचा हात, पाय, डोकं आहे हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर कारवाई केली जाईल.पर्यावरण मंत्र्यानंतर बाळा नांदगावकर गेले आपली सेना घेऊन आणि आरेवर वाकडी नजर करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही,” म्हणून पुडी सोडून आले. मुंबईतल्या गिरण्या आणि त्यांच्या जमिनी वाचवू शकलेल्या लोकांच्या तोंडी ही भाषा शोभते?

 

मुंबईला मँचेस्टरचा दर्जा देणारा कापड उद्योग चालवणाऱ्या गिरण्या बंद पडल्यावर त्यांचं काय करणार होतो या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी पुन्हा गिरण्यांच उभ्या करता आल्या नसत्या का?” असा प्रतिप्रश्न करून देता येईल. गिरण्यांच्या ठिकाणी गिरण्या येता तिथे काही स्वदेशी तर अनेक परदेशी कंपन्यांचे मोठमोठ्या मॉल्स मध्ये बाजार बसवले गेले, लोकांना भुरळ घालण्यासाठी स्काय स्क्रॅपर्स उठवले गेले. यातील आस्थापनांमध्ये काही स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या आणि लोंढ्यासोबत आलेल्या गलबताना बंदरंही मिळाली. परिणामी मुंबईची लोकसंख्या भयावह होईतो वाढली. मुंबईच्या पर्यावरणावरचा हा अति अतिरिक्त भार काचेच्या इमारतींच्या जंगलात दडपून गेला.  

गिरण्यांना गिळंकृत करणाऱ्या विकृतीनीच कदाचित आरेत जाळ काढलाय, अजून संशयाचा धूरच निघतोय म्हणून कदाचितम्हटलं. गिरण्यांच्या ठिकाणी आपण गिरण्याच उभ्या करू शकलो नाही पण आरेच्या जंगलाच्या ठिकाणी आपण जंगलच निर्माण करू शकतोय की! आपण फुफ्फुसात पुन्हा श्वास भरू शकतोय. त्यात प्राणवायू भरून त्याला पूर्ववत किंबहुना अधिक सुंदर करू शकतोय. निसर्गाचे ऋण फेडू शकतोय. आरेचा एक भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडलाय, आत्ताच जर त्वरेने पावलं उचलली नाही तर संपूर्ण आरे कधी राखेत बदलेल सांगता यायचं नाही. टपलेल्या बांडगुळांना नुसतं वाढायचं आहे, दोन्ही हातानी दाही दिशातून नुसतं ओरबाडायचं आहे. त्यांच्या पुढच्या पिढ्या परदेशात आरामात आहेत. त्यांना इथल्या मातीवर नांगर फिरवून नाणी उगवायची आहेत. तेंव्हा आत्ताच सावधान होऊया....  



आरेची जमीन भाजून निघाली आहे. याला आपण पेरणी पूर्वीची भाजणी समजूया आणि योग्य पद्धतीने, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आरेला पुन्हा हिरवी पैठणी नेसावूया. यावेळी योग्य नियोजन करून वन्य प्राणी आणि आरेत राहणारे लोक यांची क्षेत्रे नेमून घेता येतील. भविष्यातील धोके टाळता येतील. जगा आणि जगू द्याहा निसर्गाचा नियम प्रत्यक्षात अमलात आणता येईल. करूया सुरुवात ?