असं म्हणतात की `माझ्या पापाचे वाटेकरी होणार का?' हा प्रश्न वाटमाऱ्या असणाऱ्या वाल्याकोळ्याने आपल्या बायकोमुलांना विचारला होता. त्यांनी स्पष्ट नकार दिल्यानंतर त्याला उपरती झाली आणि वाल्या कोळ्याचा मुनी वाल्मिकी झाला. रामायणासारख्या महाकाव्याची निर्मिती झाली. यातील दंतकथेचा भाग जरा बाजूला ठेऊया आणि त्यातील प्रश्नावर विचार करुया. शिवाय पापपुण्य ह्या संकल्पना आपल्याला मान्य नसल्या तरी `योग्य-अयोग्य'पेक्षा त्या नक्कीच लक्षवेधी आहेत. म्हणून हा शब्दप्रयोग.
कोणत्याही अनिष्ट, अयोग्य कृतीचा परिणाम हा अंतिमत: वाईटच असतो. त्या कृतीवर कितीही बनावटपणाचे मळभ पांघरले तरी सत्य हे सूर्यप्रकाशाइतके प्रखर असल्यामुळे त्याची तीव्र किरणे आपले मार्ग काढत आपले अस्तित्व दाखवतातच. मग या दडपल्या गेलेल्या सत्याची अणकुचीदार शल्ये सभोवतीच्या जीवलगांना घायाळ केल्याखेरीज रहात नाहीत. म्हणजेच एखादा माणूस पाप करतो तेव्हा त्या पापाचे फळ त्या व्यक्तीसह त्याच्या जीवलगांनाही भोगावे लागतेच. केवळ बौद्धधम्मातच नाही तर सर्व धर्मात हे कटूसत्य सांगितलं गेलं आहे. असं असतानाही भारतासारख्या प्रत्येक धर्माला उच्चस्थान देणाऱ्या देशात भ्रष्टाचाराची विषवल्ली इतकी का फोफावली आहे?
भ्रष्टाचार म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्याच्या जीवित मूल्यांच्या मार्गावरुन पथभ्रष्ट होणे होय. आपल्या जीवित मूल्यांना प्रत्येक व्यक्ती जीवापाड जपत असते. आपल्या किंवा आपल्या कुटुंबियांवर कोणी बोट उगारु नये म्हणून आपली प्रतिष्ठा जपत असते. तो आपल्या आईवडिलांच्या नावाला गालबोट लागू देत नाही. साधी राहणी आणि उच्चसंस्कारांची पेरणी आपल्या मुलाबाळांत करत असतो. परिस्थिती चांगली नसेल तर एकवेळ उपाशी राहील पण कोणापुढे हात पसरणार नाही. आपल्या मुलाबाळांनाही कोणापुढे हात पसरायला लागू नये म्हणून त्यांच्यासाठी रक्ताचं पाणी करेल. फक्त पुरुषच नाही तर अनेक हिरकण्याही ह्याच संस्कारांची जोपासना करताना सभोवती दिसत आहेत. हे संस्कार मानवाच्या शारीरिक उत्क्रांतीसह उत्क्रांत आणि प्रगत झालेले आहेत असे समाजशास्त्र सांगते. पण आजच्या सामाजिक बदलांच्या वास्तवाचे परिक्षण करणारे समाजशास्त्रज्ञ हे ही सांगत आहेत की मानव प्रतिगामी होत उत्क्रांतीच्या पूर्वीच्या टप्प्याकडे जात आहे की काय अशी भीती वाटत आहे!
सर्व प्राणीमात्रात बुद्धी ही केवळ मानवाकडेच आहे. तिचा वापर करुनच त्याने अखिल जीवसृष्टीवर ताबा मिळवला आहे. बुद्धी आणि संस्कृतीच्या जोरावरच तो सर्वात प्रबळ बनला. हर्बर्ट स्पेन्सरने सांगितल्याप्रमाणे `सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट' अर्थात `जो सबळ किंवा प्रबळ आहे तोच तगतो' या नियमाला अनुसरुन अग्नी, चक्र, शेती, विज्ञान, तंत्रज्ञान, अणूतंत्रज्ञान हे टप्पे पूर्ण करत तो तगून राहिला. महाप्रचंड अॅनाकोंडा आणि डायनॉसॉर्स लयास गेले पण मानव तगला!
...आणि आता `सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट' हा नियम मानवातीलच प्रबळ मानवांसाठी लागू होताना दिसत आहे. अखिल मानवजातीच्या जगण्या आणि तगण्यासाठी हे निश्चितच घातक आहे!
अन्न, वस्त्र, निवारा ह्या अगदी प्राथमिक गरजांनंतर शिक्षण, आरोग्य ह्या गरजांची सर्व जगात अजूनही साकल्याने पूर्ती झालेली नसतानाच स्टेटस ही आणखी एक गरज पहिल्या जगाकडून संक्रमित होत तिसऱ्या जगात स्थिरस्थावर झाली आहे. ही गरज माणसांच्या जगण्याशी काडीमात्र संबंधित नाही तर ती संबंधित आहे त्याच्याकडे असलेल्या सिंबॉल्सशी, चिन्हांशी. आपल्याकडे उच्चप्रतिचे सिंबॉल्स असावेत ही माणसाची स्वयंस्फूर्त प्रेरणा आहे असं फसव्या पद्धतीने माणसाच्या मनावर बिंबवून ही स्टेटसची गरज जाणीवपूर्वक निर्माण केली आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य ह्या मूलभूत गरजांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आर्थिक व्यय ‘स्टेटसच्या परिपूर्ततेसाठी करावा लागतो. या जाणिवेतूनच जीवित मुल्यांवरुन पथभ्रष्ट होण्याची सुरुवात होते. भ्रष्टाचाराची सुरुवात होते!
आज उघडकीस येत असलेल्या सगळ्या भ्रष्टाचाराचे आर्थिक व्यवहार हे अंकामध्ये लिहिता येणाऱ्या म्हणजे हजार कोटी किंवा कोटी हजार अशा आकड्यात असतात. ते ही एखाद्या व्यक्तीच्या घरात, परदेशी स्वीस सारख्या बँकामध्ये तर असतातच. याशिवाय नातेवाईकांमध्येही  विभागलेले असतात. लेखाच्या शिर्षकात विचारलेला आमचा प्रश्न हा या विभागून अवैध संपत्ती गोळा करणाऱ्या सर्व नातेवाईकांसाठी आहे. स्टेटस सिंबॉल्सचं प्रदर्शन करीत ‘आपण खूप परिश्रम करतो म्हणून स्टेटस जपू शकतो' म्हणणाऱ्याना आहे. किंबहुना भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीच्या पती अथवा पत्नी आणि मुलांना आमचा हा प्रश्न आहे.
उच्च पदावरील किंवा कनिष्ठ पदावरील व्यक्ती नेमका किती पगार घेतो किंवा घेते हे त्याच्या पती अथवा पत्नीला माहित असते. अपवाद सोडले तर दोघांच्या मतानेच घरातील आर्थिक गणित मांडले जात असते. त्यामुळेच घरात झालेला थोडासा बदलही आपल्या ध्यानात येतो. अशावेळी भ्रष्टाचारातून आलेल्या पैशांमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात झालेले स्टेटसमधील बदल सहचाऱ्याला कळणार नाहीत? शक्य नाही. त्याचा जाब विचारण्याऐवजी नातेवाईकांमध्ये इतरांपेक्षा आपण कणभर सरस किंवा श्रीमंत असण्याची स्पर्धाच लागलेली दिसतेय. स्टेटस ही कोणाची गरज असेलही पण ती जपण्यासाठी कोणातरी दुसऱ्याचा हक्क मारला जातो. कोणातरी दुसऱ्याची वित्त किंवा जीवित हानी झालेली असते, तेव्हाच तो भ्रष्टाचार होतो. तेव्हाच ते पाप होते. असा दुसऱ्याच्या तोंडचा घास काढून आपण तूपरोटी कशी खाणार? एवढा पैसा कुठून आला याचा जाब नातेवाईकांनी विचारला असता तर इतका भ्रष्टाचार झाला नसता. म्हणून गरज आणि हव्यास यातील फरक कळायला हवा. घेणे स्वाभाविक आहे पण ओरबाडून घेणे अनैसर्गिक आहे. प्रगती आणि विकासाचा भ्रम यातील फरक ओळखायला शिकलं पाहिजे. कारण भ्रष्टाचारप्रकरणी पकडला जाऊन बातमीदारांच्या कॅमेऱ्यासमोर तोंड लपवणारा केवळ एक माणूस नसतो तर ते त्याचं अख्खं कुटुंब असतं. त्याच्या पापात वाटेकरी झालेलं त्यांचं अख्खं... कुटुंब...!
एखादा व्यक्ती एकटाच संपत्तीचा उपभोग घेऊ शकत नाही. आपल्या कुटुंबासाठी तो हे करतो. त्यामुळे त्याला शिक्षा करुन भ्रष्टाचार मिटत नाही उलट तो फोफावण्याची प्रक्रिया जोमाने सुरु होते. कारण भ्रष्टाचाऱ्यासोबत भ्रष्ट झालेल्या कुटुंबियांनाही सोन्याची अंडी देणारी कोंबडी अशी गजाआड जाणे परवडणारे नसते. सुजाण वाचकांना अधिक सांगणे लगे!


वाल्याकोळ्याचा वाल्मिकी झाला तसाच अहिंसकाचा अंगुलीमाल झाला आणि अंगुलीमालाचा अर्हंत अंगुलीमाल झाला. हे स्थित्यंतर म्हणजे मानवाची स्वत:तच होत जाणारी उर्ध्वगमनीय उत्क्रांत अवस्था आहे. भ्रष्टाचारमुक्त देशाचा पाया आहे. मात्र त्यासाठी आपल्या प्रश्नाचं उत्तर नक्की काय येतंय त्याचं चिंतन करणे गरजेचे आहे.