दिवाळी नुकतीच सरलीय. फटाक्यांच्या धुराचा धुरळाही आता खाली बसलाय. आता सुरु झालीय ती या दिवाळीत बिजनेस किती झालाय याची मोजदाद. अगदी शेअर बाजारापासून ते फुल बाजारापर्यंत सगळीकडे लक्ष्मी प्रसन्न झाली का याचा ताळेबंद बांधला जात आहे. मात्र या संपूर्ण बाजाराच्या मुळाशी असणाऱ्यांना त्या दिवाळीच्या आनंदोत्सावातून आनंद मिळाला, पैसा मिळाला की नुसत्याच जखमा मिळाला याचे ताळेबंद बांधलेच जाणार नाहीत कारण तो नक्कीच घाट्याचा व्यवहार असेल. कारण हा ताळेबंद जर चव्हाट्यावर आलाच आणि लोकसंगर निर्माण झालाच तर या सगळ्यांची दुकानं बंद होतील. मात्र एका वर्गाने सतत गुलामगिरीतच खितपत राहणे हा आपल्याकडचा एक अलिखित नियम आहे. म्हणूनच देवाधर्माच्या नावाने सणोत्सव साजरा करणाऱ्यांना त्याच्या पीडितांवर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती असली तरी त्यांच्या वेदनांची जाणीव नसते. मग पूजाअर्चनेच्या परंपराही सुरु राहतात आणि पीडितांच्या जखमाही भळभळत राहतात, अव्याहतपणे.
इतर सर्व सणांसारखाच दिवाळ सण असला तरी गोडधोड, फुलाफळाखेरीज फटाके हा या उत्सवाचा एक महत्त्वाचं अंग आहे. दिव्यांच्या रोषणाईसह फटाक्यांच्या रोषणाईला खास महत्त्व आहे. म्हणूनच कोट्यवधीचा महसूल मिळवून देणाऱ्या फटाक्यांच्या उद्योगालाही भारतात फार महत्त्व आहे. तेवढेच महत्त्व आहे संपूर्ण देशाला ९० टक्के फटाक्यांचा पुरवठा करणाऱ्या सिवाकासी या तमिळनाडूतील लहानशा शहराला.
फटाक्यांच्या उद्योगाला आवश्यक असलेल्या एकंदर ९००० फॅक्टरीज सिवाकासिला आहेत. यात फटाके तयार करून त्यांचे पोस्टर्स, कवर, डिजाईन करणाऱ्या प्रिंटींग प्रेस, कलर आर्टीस्ट, कॅलेंडर्स या सगळ्यांची कार्यालये आहेत. इथूनच जगातील ८० टक्के माचीसच्या काड्या बनवल्या जातात. याशिवाय प्रिंटींगसाठी आवश्यक असणारे रासायनिक रंगही सिवाकासी येथे बनतात. सिवाकासी हे जर्मनीतील गुटेनबर्गनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे जिथे सर्वात अधिक ऑफसेट मशीन्स आहेत. देशातील सर्वात जास्त डी.टी.पी ऑपरेटर्स सिवाकासीत आहेत म्हणून तामिळनाडू हे देशातील सर्वात अधिक संगणक वापरणारे राज्य ठरले आहे. एकट्या दिवाळीत सिवाकासीचा व्यवसाय होतो अंदाजे १००० कोटी ! सिवाकासी जवळ असलेल्या थिरूथंगल या गावात पिवळ्या ग्रानाईटचे साठे आहेत. देशातील सर्वात जास्त कर भरणाऱ्या शहरांपैकी एक सिवाकासी हे शहर आहे. शिवाय इथे १०० टक्के रोजगारी आहे. या सर्व उत्तमोत्तम आकडेवारी मागे आहे माणसाच्या जीवनाला कलंक लावणारे भयाण वास्तव !
१९६० पासून सुरु झालेल्या या लहानशा उद्योगात ८० च्या दशकापर्यंत बालमजदुरी सुरु होती. नंतर ती कायद्यान्वये बंद झाली असा दिखावा निर्माण करण्यात आला. कारण आता तीच मुलं घरी बसून कोणतंही शिक्षण न घेता फटक्याची कामे करत असतात. वरील उद्योग आपण पहिले तर सर्वच्या सर्व उद्योग हे ज्वलनशील पदार्थांशी संबंधित आहेत. वर्षाला किमान ५० आगी लागण्याचे प्रकार घडत असतात. एका वेळच्या आगीत ३० ते ४० लोक मृत्यूमुखी पडतात तर शंभरेक तरी आयुष्यभरासाठी पंगू, अंध होतात.
१८८४ चा एक्स्प्लोजिव अॅक्ट इथे लागू आहे. या कायद्यात प्रत्येक फटाक्यांच्या आणि माचीसच्या फॅक्टरीत रासायनिक मिश्रण मोजून मापून घेण्यासाठी लॅब असणे अनिवार्य आहे. पण ही लॅब इथल्या मुजोरांना ‘परवडत’ नसल्यामुळे ३०-४० रुपयांच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या जीवाशी बिनधास्त खेळले जाते. मात्र या कायद्यातील पळवाटा शोधून काढणाऱ्यांना कायद्यान्वये काही रासायनांना आपल्या देशात मान्यता नसल्यामुळे चीनी फटाक्यांच्या पुढे आपले फटाके मिळमिळीत वाटतात, त्यामुळे चीनी फटाक्यांनी ४० टक्के मार्केट काबीज केल्याचं दुःख मात्र खूप आहे. या बाजारात टिकून राहण्यासाठी मग अवैध पद्धतीने फटाके तयार केले जातात आणि पुन्हा एकदा खेळ सुरू होतो गोरगरिबांच्या जीवाशी.
0 Comments
Post a Comment