मुंबई म्हणजे नेहमी धावणारी नगरी. आपल्याशिवाय इतर कुणासाठीही न थांबणारी. सिनेमा, क्रिकेट यांच्या जननीत्वासोबत राजकारणाचे पितृत्व आणि जगभरातल्या उद्योगांच्या
पालकत्वाची जबाबदारीही तिच्यावरच. म्हणूनच इथल्या प्रत्येक हाताला काम आहे आणि प्रत्येक कामाला दाम आहे. याच वैशिष्ट्यांमुळेच मुंबई विघातक शक्तींच्याही रडारवर आहे. मुंबईच्या वेगाला आजवर अनेकवेळा अटकाव करण्याचा प्रयत्न झाला. पण मुंबई थांबली तर संपूर्ण जगातील वर्किंग कपॅसिटीचा म्हणजेच कृती क्षमतेचाच फज्जा उडतो. म्हणून मुंबई कधीच कोणत्याच कारणाने थांबली नाही. यालाच जगभरात `मुंबई स्पिरीट' म्हणून नावाजले जाते. पण आताशा या ‘मुंबई स्पिरीट’ वर शंका येऊ लागली आहे. ते खरंच आहे की त्यातील स्पिरीट उडून खाली केवळ जुनाट शेवाळग्रस्त पाणी उरलंय कळत नाही.
बाँबस्फोट किंवा अस्मानी संकट यांना तोंड देताना मुंबई क्षण दोन क्षण थांबली होती. हे थांबणं खरं तर मुंबईचा मानवी चेहरा दाखवणारं होतं. मुंबईच्या संवेदनशीलतेचा पुरावा होतं. पण वन्स इन अ ब्लू मून घडणाऱ्या घटनांनी थरथरुन थांबणारी मुंबई पुन्हा सुसाट सुटली की तिच्या स्पिरीटचे गोडवे गायले जातात. हे स्पिरीट आहे की असंवेदनशीलता? वाहते ती नदी आणि थांबतं ते डबकं हे वाचयला छान वाटतं पण तलवार सतत चालवत राहिली तर ती ही बोथट बनते. मुंबईच्या स्पिरीटचंही असंच काहीसं झालं आहे. त्यात सणवार, क्रिकेटचे सामने, नवा चित्रपट, मोठ मोठे इव्हेंटस हे मुंबईकरांच्या मेंदूत इंजेक्ट केलेलं स्पिरीट फसफसवायला पुरेसे असतात. मुंबईत किंवा शेजारच्या पुणे, नाशिक, औरंगाबाद इथे घडणाऱ्या किंवा शेजारी राज्यात गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान इथे घडणाऱ्या घटनांनंतरही स्पिरीट नव्याने बाटलीबंद केलं जातं. कसं ते उदाहरणासह समजून घेऊया.
पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली तो दिवस होता रक्षाबंधनाचा. लोकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनं केली. पण कोणीही आज रक्षाबंधन करणार नाही असा निश्चय केला नाही. नंतर मुंबईत एका फोटोजर्नालिस्ट महिला पत्रकारावर सामुहिक बलात्कार झाला. यावेळी मुंबईकर दोनदा रस्त्यावर उतरले. एकदा आंदोलनासाठी आणि एकदा दहीहंडीसाठी. हेच आहे का ते मुंबई स्पिरीट?
उठसूट राजकारण्यांना नावं ठेवणं हा मुंबईकरांचा आवडता छंद. रस्त्यांवरच्या खड्ड्यांची मोजदाद करुन बीएमसीच्या नावाने बोटं मोडणाऱ्या मुंबईकरांना त्याच रस्त्यावर बांधली जाणारी लाखो-करोडोंची दहीहंडी कशी काय चालते? कोट्यवधीची दहीहंडी स्पॉन्सर करणारे नेते मंडळी त्या पैशात रस्ते दुरुस्त करु शकतात. इतर नागरी सुविधा पुरवू शकतात हे या स्पिरीटवाल्यांच्या खिजगणतीतही का नसतं?
त्यांनंतर देवाचा स्वयंघोषित दलाल आसाराम बापूला एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक झाली. त्याचाही निषेध झाला पण तुटपुंजा. कारण आता निषेधाला रस्त्यांवरही जागा नाही. गणेशोत्सव होता ना. तेंव्हा तर रोजचा शेकडो टन निर्माल्याचा खच. ध्वनी, वायू, जल प्रदुषणाचा कडेलोट. गंमत वाटतेय ती एका वेगळ्याच गोष्टीची. गणपतीतील चलतचित्र आणि संकल्पनाधारीत डेकोरेशन हे नास्तिकांच्याही आवडीचे विषय. यात अनेक गणेश मंडळं अलिकडे घडलेल्या घटनाक्रमावर हे डेकोरेशन करतात. हे विषय खरंच फार कल्पक पद्धतीने मांडलेले असतात. मग कल्पना करा, एखाद्या गणेश मंडळाने डॉ. दाभोळकरांच्या हत्येच्या निषेधाची संकल्पना मांडली आहे... एकीकडे दाभोळकरांची हत्या त्यांच्या पुरोगामी चळवळीमुळे झाली हे दाखवलं जात आहे आणि त्याच्याच बाजूला त्या गल्लीचा ‘राजा’ असलेल्या, मंडळ घोषित ‘स्वयंभू’ गणपतीला नारळ, हळद पुंकू वाहून नवस केले जात आहेत. गेल्या वर्षीचे नवस फेडले जात आहेत. तिथेच एखाद्या पाचव्या सहाव्या दिवशी म्हणजे शनिवार पकडून सत्यनारायणाची पूजा केली जात आहे आणि दाभोळकरांच्या प्रतिमेपेक्षा सत्यनारायणाकडे गर्दी जास्त लागली आहे. कळस म्हणजे या गणेश मंडळाला संवेदनशील विषय हाताळल्याबद्दल एखाद्या आमदाराने पुरस्कृत केलेलं बक्षीसही मिळत आहे. ही नुस्ती कल्पना नाही तर हे आहे मुंबई स्पिरीटचं वास्तव.
खरंच मुंबईत उडून न जाणारं, धैर्य, गती, सहवेदना, सहभावना आणि संवेदनशीलता जपणारं स्पिरीट असेल तर मुंबईकर एक वर्ष एखादा सण वजा करतील? डॉ. दाभोळकरांना आदरांजली म्हणून पितृपक्षात (मुद्दामहून) जास्तीत जास्त खरेदी करतील? दोन दिवसाला एक बलात्कार होत असण्याचे अहवाल समोर येत असताना मुंबईकर नवरात्रासारख्या उत्सवाला ज्यात तरुण तरुणी अधिकाधिक जवळ येतात, तिलांजली देतील?
दिवाळीमध्ये गोडधोड, फटाके यांना ‘नाही’ म्हणतील ? एक अख्खं वर्ष कोणत्याही जल्लोषाशिवाय काढतील? उत्तर नकारार्थीच येणार असेल तर मुंबईचं स्पिरीट केव्हाच आकाशात उडून गेलंय असंच म्हणावं लागेल. पहा विचार करुन.
0 Comments
Post a Comment