त्यांच्या शरीरात लोह कमी असतानाही उत्तम खेळी करीत कांस्य पदकावर ताबा मिळवला. त्या आहेत भारतीय ज्युनियर हॉकी संघातील मुली. विश्वचषक स्पर्धा म्हणजे केवळ क्रिकेटचा महकुं म्हटलं गेल्याने इतर कोणत्याही विश्वचषकाचा गाजावाजा सोडा पण बोटभर बातमी देखील लावलीच तर ती हि लाजेकाजेखातर लावली जाते. यावेळी मात्र बातमी झाली ती ज्युनियर हॉकी विश्वचषकावर आपली नोंद करणाऱ्या मुली ह्या कुपोषित असल्याच्या भारताच्या राष्ट्रीय हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांच्या दाव्यामुळे. ज्युनियर हॉकी संघात तब्बल मुलींमध्ये लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे त्यांच्यात रक्त कमी असून त्या अॅनिमियाग्रस्त आहेत हा त्यांचा दावा खराच असावा किंबहुना तो आहेच. पण यानंतर त्या मुलींचं कौतुक करावं की हॉकी व्यवस्थापनाला शिव्या घालाव्यात हे कळत नाही. कोणतीही व्यक्ती अॅनिमियाग्रस्त असेल तर ती कोणत्याही क्षणी कोलमडू शकते. ज्युनियर हॉकी संघातील या मुली १८ वयाखालील आहेत. अर्थात वाढत्या वयाच्या. त्यात हॉकीसारख्या पूर्ण शारीरिक उर्जा वापरायला लावणाऱ्या खेळाच्या त्या शिलेदार. आंतरराष्ट्रीय खेळासाठी निवड करताना डोपिंगच्या चाचणीत पॉझिटीव्ह आढळलेल्या अनेक भारतीय खेळाडुंचं आयुष्य बरबाद झालंय. डोपिंग म्हणजे आपली शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी काही अतिरिक्त आणि कायद्याने बंदी आणलेल्या ड्रग्जचं सेवन करणं, जे बेकायदेशीर आहे. अशा अत्यंत परखड चाचणीतून खेळाडुंना जावं लागत असताना लोह, कॅल्शियम आणि इतर आवश्यक खनिजांची शरीरात उणीव असल्यामुळे या मुली क्वालिफायच कशा झाल्या? डोपिंगने अतिरिक्त उर्जा घेणं आणि मुळातच उर्जास्रोताचा अभाव असणं या दोन्ही गोष्टी बेकायदेशीर नाहीत का ? डोपिंगमुळे स्पर्धात्मकता लोप पावते तर अभावामुळे स्पर्धा रहातच नाही. युरोप, . आफ्रिका येथील धिप्पाड मुलींच्या समोर आमच्या कमकुवत मुलींना कोणत्या लालसेपोटी उभं केलं गेलं ? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील निवड समितीवर काही कारवाई होणार कि आमच्या कुपोषित मुला-मुलींना असंच ‘देशासाठी’ खेळावं लागणार ?


भारतातील ८० टक्के स्त्री - पुरुष कोणत्या ना कोणत्या अभावातच जगत आहेत. असं पोषणमुल्य तपासण्याची यंत्रणा बिंत्रणा कशाशी खातात आम्हाला माहितच नाही. इथे जेवायला मिळतं म्हणून शाळेत जाणाऱ्या मुलांचं जेवणात विष घालून हत्याकांड घडवलं जातं. खुराकाचा अभाव असताना आपल्या आयुष्याची २०-२० वर्ष खेळाला देणारे खेळाडू एका डोपिंग टेस्टमुळे खलनायक ठरतात. तिथे आमच्या या मुलींच्या हाती केवळ त्यांच्यातील जिद्दीच्या बळावर हॉकीस्टीक दिली असेल आणि त्याला आंतरारष्ट्रीय स्तरावरही कोणी अडवलं नसेल तर या सारखा करंटेपणा दुसरा नाही. मुकं करोति वाचलम् पंगुं लङ्घयते गिरीम् हा युक्तीवाद असो की `इच्छा तिथे मार्ग' सांगणारा शहाजोगपणा असो, वाचायला बरं वाटत असलं तरी या प्रत्येकाला एक मर्यादा आहेच आहे. आमच्या मुलींनी ही प्रचंड उणीव असताना परदेशात जाऊन लोहा दिला. त्यांच्या इच्छाशक्तीवर आमचा विश्वास आहे आणि त्यांच्या खेळाचा आम्हाला अभिमान आहे. यापुढे त्या मुख्य संघातून अनेक देशी विदेशी विविध स्पर्धा, विश्वचषक, ऑलिम्पिक्समधून खेळतील अशी आशाही निर्माण झाली आहे. त्यावेळी मात्र त्यांनी प्रत्यक्ष सुवर्णपदकावरच शिक्कामोर्तब केला पाहिजे. हॉकी आमचा राष्ट्रीय खेळ आहे. त्यामुळे विश्वचषकावर आमचे नाव कोरले पाहिजे. पण त्यापूर्वी या लोहकन्या सुदृढ आणि बळकट होणं आवश्यक आहे. कारण त्या भारतातील हजारो, करोडो मुलींचं प्रेरणास्थान आहेत. ज्यांच्यातून आणखी खेळाडू भारताला मिळणार आहेत, ज्या स्वत: अभावग्रस्त आहेत. त्या सर्व मुलींना सुयोग्य पोषण मिळण्याची वाच्यता या लोहकन्यांनी आपल्या विजयातून दिली आहे. इट इज हाय टाईम नाऊ