कायदा हा गाढव असतो असं जे कोणी म्हणत असतील त्यांना एका दूरचित्रवाणी वाहिनीवर सुरु असलेल्या रिऍलिटी शोमुळे आता हे कळलं असेल की इथे कायदा ज्यांना माहित नाही ते गाढव आहेत. `बिग बॉस' या मनोरंजनापेक्षा भांडणाच्या सार्वत्रिक क्लाससाठी लोकप्रिय असलेल्या कार्यक्रमातील मूळच्या पाकिस्तानी आणि नंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या सोफिया हयात हिने अरमान कोहली या भांडकुदळ कलाकाराला हवालात की हवा खायला पाठवलं आहे, तेही चक्क शो सुरु असताना. भारतीय कायद्यासमोर कोणीही मोठा नाही याचे मनोरंजनाच्या विश्वातील यापेक्षा मोठे उदाहरण मिळणार नाही.
तिन्हीत्रिकाळ आपल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱयाने वॉच ठेवला जातोय हे माहीत असताना आपल्यातील जनावराला असा मोकळा सोडणाऱया या महाभागांना अखेर रिऍलिटीचा दुसरा अर्थ `झाकली मूठ ही सव्वा लाखाची' असा असतो याची उपरती झाली असावी. पण या रिऍलिटीमुळे भारतीयांची कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भातील मानसिकता प्रकर्षाने जाणवली.
`बिग बॉस' या रिऍलिटी शोमध्ये जगभरातील त्या त्या वेळी चर्चेत असणारे किंवा चर्चेत येऊ शकणाऱया चेहऱयांना सामील केले जाते. आठवले साहेबांचंही नाव दुसऱया की तिसऱया सिजनमध्ये चर्चेत होते. पण त्यांच्या ऐवजी संजय निरुपम यांची वर्णी लागली आणि पुन्हा एकदा दलितावर अन्याय झाला म्हणून आपल्या कार्यकर्त्यांनी कलर्स वाहिनीच्या कार्यालयाच्या काचा फोडून निषेध व्यक्त केला होता. आम्हाला तर तेव्हा आणि आता या उपरोक्त घटनेनंतर आपल्या कोणत्या माणसाला या कार्यक्रमात सामील केले गेले नाही याचे हायसेच वाटते. इतकी रिऍलिटी पाहण्याची आम्हाला हौसही नाही आणि हिम्मतही नाही. प्रमोद महाजनांच्या अंत्यविधीला सर्वांना दिलासा देणारा राहुल महाजन त्यावेळी भाव खाऊन गेला म्हणून तो `बिग बॉस'च्या लिस्टमध्ये आला आणि त्याच्या सोबत त्याची `प्रकरणं'ही आली. लोकपाल विधेयकावर टीम अण्णाला पाठिंबा देताना आपल्या कौशल्याचा वापर आपण संविधानाचा अपमान करण्यासाठी करतोय याचं भान सुटलेल्या कार्टुनिस्ट असीम त्रिवेदीला सहजच एनलिस्टेड केले गेले. का ? कशासाठी ?  शेवटपर्यत कळले नाही. त्याने आपण `बिग बॉस'च्या स्पर्धेत असल्याचा कोणताही `ठपका' मागे ठेवला नाही. स्वतला सुपर स्टार म्हणवून घेणाऱयांनाही या कार्यक्रमात आणले पण ते नेमके कोणत्या कामाचे सुपरस्टार होते हे अनेकांना माहित नसल्यामुळे खिजगणतीत गेले. यासाठी तुम्ही जितका हंगामा कराल तितकं तुम्हाला लोक ओळखू लागतील असं या रिऍलिटी शोचं समीकरण बनलं. नाही तर डॉली बिंद्रा, इमाम सिद्दीकी, सपना भावनानी असे अनेक स्वतसाठी, स्वतच्या मर्जीने जगणाऱया प्रसंगी इतरांना शारीरिक मानसिक इजा पोहोचवणाऱया स्वयंघोषित `महान', `नंबर वन' व्यक्ती आपल्याला कळल्या तरी असत्या का?
`बिग बॉस' हा कार्यक्रम मूळच्या नेदरलँडच्या असलेल्या आणि 23 देशांमध्ये आपल्या मनोरंजन क्षेत्राचं जाळं असलेल्या `एन्डेमॉल' या कंपनीची निर्मिती आहे. जूप वॅन डॅन अँडे आणि जॉन डे मॉल या डच निर्मात्यांनी `द गोल्डन केज' नावाने 6 लोकांना एका खोलीत बंदीस्त करुन त्यांच्यातील मानवी भाव भावना टिपण्याचा प्रयोग करण्याची संकल्पना 4 सप्टेंबर 1997 रोजी मांडली आणि तिला रिऍलिटी शोचे रुप 2000 साली देण्यात आले `बिग ब्रदर' या नावाने. भारतीयांना हा कार्यक्रम कळला तो शिल्पा शेट्टीमुळे. `बिग ब्रदर सिझन 5 - 2007' मध्ये जेड गुडी या आपल्या सहस्पर्धीच्या वंशवादी वक्तव्याचा तिने कडाडून विरोध केला. ती या भागाची विजेतीही झाली. त्यानंतर भारतात `एन्डेमॉल'ने पाय पसरले. आज या कंपनीचा पसारा अनेक देशांच्या शेअर बाजारात होणाऱया हजारो कोटींच्या उलाढालीवर उभा आहे. ही उलाढाल होतेय विकृत माणसांच्या विकृतीवर वाढत जाणाऱया टेलिव्हिजन रेटिंग पॉईंटमुळे (टीआरपी) आणि त्या विकृतीला तेवढ्याच चवीने पाहणाऱया आपल्यासारख्या असंख्य प्रेक्षकांमुळे. या कंपनीला भारतातील एक पिढी टीव्हीमुळे बरबाद झाली तर काही फरक पडणार नाही.

... पण सोफिया हयात हिच्या कायद्याचा मार्ग अवलंबण्याचा फटका या कंपनीला आणि या कंपनीसारख्या अनेक कलागती कंपूंना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतातील कायदे कुचकामी नाहीत, मजबूत आहेत. ते बदलण्याची, संविधानात दुरुस्त्या नाहीत तर अख्खं संविधानच बदलण्याची भाषा करणाऱयांना ही एक चांगली चपराक आहे. कायदा तेव्हाच अंमलात आणला जाऊ शकतो जेव्हा त्याची तक्रार होते. `मला काय त्याचे', `सरकार झोपलेय का' `सरकार आंधळे आहे का' म्हटले तर कायदा अडगळीतच पडणार. पण सोफियाप्रमाणे एवढ्या मोठ्या कंपनीने ऑफर केलेल्या सहभागी रकमेची परवा न करता पोलीस स्टेशनचा रस्ता धरला तरच कायदा राबवला जाऊ शकेल. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱया सर्व रक्षकांनी, `तिथे सोफिया हयात होती, नाही म्हटले तर उच्चभ्रूच शिवाय अभारतीय, आम्ही तक्रार केली तर पोलीस ती दाखलही करुन घेत नाही,' हा सर्वसामान्यांचा समज दूर करायला हवा. व्हाईटकॉलर उच्चभ्रू भारतीय कायदे हे मोडण्यासाठीच असतात असं श्वास घेण्याच्या सहजतेने म्हणून जातात. अन्यथा अरमान कोहली प्रमाणे डॉली बिंद्रा आणि इमाम सिद्दीकीही तेव्हाच जेरबंद व्हायला हवे होते. पण यांनी ज्या लोकांना `बिग बॉस' मध्ये त्रास दिला ते सर्व भारतीय होते. `जाऊ दे' टाईप मानसिकतेचे. अरमानने मात्र एका अभारतीय स्त्राrला शारीरिक मानसिक त्रास दिला. जिला कायदा, त्याचा वापर, त्याचा सन्मान आणि त्याची प्रक्रिया याची माहितीच नाही तर तो अंमलात आणला जाण्याचा पक्का विश्वास होता. राष्ट्रीय सोबत आंतरराष्ट्रीय कायदेही अस्तित्वात आहेत याची तिला पुरेपूर कल्पना होती. आरमानला बिग बॉसच्या घरातून ऐन कार्यक्रम सुरु असताना अटक झाली. `तो काय सुटणारच' असं म्हणून याकडे पाहिलं तर ही विनासायास सुरु झालेली परिवर्तनाची प्रक्रिया मध्येच थांबेल. कारण इंटरनॅशनल मीडिया आणि त्याचे वर्चस्वासाठी कार्यरत असणारे पोशिंदे कायम `सजग' असतात.