शाळेत असताना `माझे बाबा' हा विषय निबंधासाठी आला की मला काय लिहायचं हे कळायचंच नाही. सतत आपल्या कामात व्यस्त, रात्री नव्हे तर पहाटे 3-3.30 ला घरी येणाऱया बाबांविषयी मी काय लिहीणार ? त्यापेक्षा आईवर लिहीणं एकदम सोप्प होतं. कारण ती सतत जवळ असायची. बाबा कळायचे ते तिच्या बोलण्यातून. परिक्षा, प्रोजेक्ट्स, सम्मेलनं, आजारपणं, गप्पा, गाणी ... अगदी सगळं बालपण आईने व्यापून टाकलेलं. बाबा यात कुठेच नसायचे. लोकांच्या  आदरयुक्त बोलण्याचालण्यातून आपले बाबा दुसऱयाच एका बाबांच्या कच्छपी लागले आहेत एवढं कळायचं. पण डॉक्टर असलेल्या या बाबांचा फोटो गौतम बुद्धाच्या शेजारी का ठेवलाय काही कळायचं नाही. मोठे होत गेलो तसे आपल्या मोठे होण्यालाही ते बाबाच कारण आहेत हे खोलवर रुजत गेलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या बाबाने आमचं अवघं आयुष्य व्यापलं होतं, व्यापलं आहे. आणि या बाबांच्या अशा सर्वव्यापी असल्यामुळेच स्वतच्या बाबांचा म्हणावा तसा सहवास लाभला नाही, ही खंत देखिल आहेच.
आज आंबेडकरी चळवळीत झोकून देऊन काम करणाऱया सर्वच बाबांच्या कुटुंबातील मुलांमध्ये थोड्या अधिक फरकाने हिच जाणीव आहे. खरं तर सर्वच कार्यकर्त्यांची अवस्था ही `कोणता झेंडा घेऊ हाती' अशी झाली आहे. त्यात दर महिन्याला काही तरी नवा विषय एकमेकांची डोकी फोडण्यासाठी डोकं वर काढत असतो. खुद्द बाबासाहेबांनी सुरू केलेल्या अस्मितेच्या लढाईला आता श्रेयाच्या लढाईचे व्यापक रूप आले आहे. `जातीयवाद अजून संपलेला नाही, अन्याय अत्याचार अजून जैसे थे अवस्थेत आहेत, मनुवाद्यांनी देशाच्या मागासवर्गाला स्वातंत्र्य उपभोगूच दिले नाही,' असे आपले  बाबा नेहमीच आपल्या भाषणातून पोटतिडकीने मांडत आले आहेत. पण या जुनाट दुःखासोबतच आपल्याच माणसांकडून नाकारले जाणे, दुसऱयाची राजकीय महत्त्वाकांक्षा जपताना आपले शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान होत आहे, हे ही त्यांच्या मनात खदखदत आहे हे जाणण्याइतके लहान आम्ही खचितच नाही. चळवळ करावी तर ती निरपेक्ष बुद्धीने करावी असे रोज डोस प्यावे लागणाऱया कार्यकर्त्यांच्या ओंजळीत काहीच पडत नाही. बाबासाहेबांच्या नावावर आपले प्राण ओवाळून टाकणाऱया कार्यकर्त्यांची मुलं केवळ आपल्या बाबांच्या सुखरुपतेची आशा बाळगून त्यांच्या घरी लवकर परतण्याची वाट पहात असतात. आपल्या दावणीला या सर्व साध्या कार्यकर्त्यांना बांधणाऱया नेत्यांनी त्यांचा नाही तर मुलांचा तरी विचार करावा.    
डॉ. बाबासाहेबांनी घालून दिलेले सन्मार्ग सर्वांनाच आचरणीय आहेत. पण त्या सोबतच त्यांना आताच्या युगासोबतच आलेल्या रॅट रेसलाही सामोरं जावं लागतंय. मुळातच तळागाळातून वर आलेला आणि येऊ पाहणारा कार्यकर्ता हा अनेक व्यसनांना सोबत घेऊनच चळवळीत आला आहे. त्यामुळे तो तसाही शिकल्या सवरलेल्या लोकांच्या शिव्याशापांचा धनी होतो. विमनस्क अवस्थेतील व्यक्ती नेहमीच योग्य असा निर्णय घेतेच असं नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या नावाने कोणी गरळ ओकायला सुरूवात केली की त्याचे माथे भडकणारच. आपण काहीही केलं तरी जणू काही आपले बाबासाहेबच आपल्या पाठीशी उभे राहणार आहेत या विश्वासाने ते चौदावं रत्न उगारतात. पण `ही उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती' असा पाठींबा कधीच मिळत नाही. आणि परिणाम नेमका उलटा होतो. आंबेडकरी चळवळ संपत चालली आहे, आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आधी अभ्यास करावा अशा कानपिचक्या ऐकाव्या लागतात. पुन्हा एकदा विमनस्क झालेले बाबा, ते घरी येतील तेंव्हा कोणत्या अवस्थेत असतील सांगता येत नाही. अगदी कोणत्या `अवस्थेत' असतील  काहीच सांगता येत नाही.
आतापर्यंत असं पाहिलं आहे की समाजामध्ये असे बरेच लोक आहेत जे स्वतची नोकरी सांभाळून चळवळींमध्ये सहभागी होतात, त्यांना सहजासहजी कोणी आपल्या दावणीला बांधून ठेऊ शकत नाही. खरंतर ज्यांना पैशाची हाव नाही त्यांना कोणीच दावणीला बांधू शकत नाही. पण असे अनेक लोक आहेत ज्यांना बाबासाहेबांखेरीज जर काही पुज्य असेल तर तो आहे पैसा. त्यांच्या मुलांना लहानपणापासूनच अनेक सोयी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे महागडे परदेशी शिक्षण, मोठे व्यवसाय, उच्च राहणीमान हे सहज शक्य झाले आहे. त्या मुलांना चळवळींशी काही देणे घेणे असल्याचं दिसत नाही. उलट रस्त्यावरच्या ज्या कार्यकर्त्यामुळे आपण सतत लाभ घेतलेली आरक्षणाची सुविधा अजूनही शाबूत आहे त्या कार्यकर्त्याविषयी जराही जिव्हाळा नाही. उलट `आता आरक्षणाची काय गरज' असं आपल्या उच्चभू मित्रांच्या गमजा आपल्याच लोकांना ऐकवतात. मग सामान्य कार्यकर्ता त्यांना `बेनेफिशरीज' म्हणून हिणवतो. एकाच वेळी एकाच पातळीवरून वर उठलेल्या समाजात एवढी दरी कशी काय राहिली बरं, हे सुटणारे कोडे आहे.

आपल्या प्रत्येकांच्या बाबांनी बाबासाहेबांनी जाणीव करून दिलेल्या अस्मितेच्या प्रत्येक लढाईत उडी घेतली आहे. आपल्या बाबांना कोणत्याही चळवळीचे वावडे नाही. चळवळीशी संबंधित कोणतेहि चर्चासत्र घ्या. तिथे उसळणारी गर्दी पाहिली की वाटतं, एवढी ताकद आहे आमच्या समाजाकडे, ही नेमकी कोणत्या कामासाठी वापरली जातेय ? पोस्टर्स लावणं आणि हँडबीलं काढणं यासाठीच या एवढ्या समाजाचं औचित्य राहिलं आहे का ? प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार काम करतोय. याचं प्रत्यंतर येतं ते 6 डिसेंबरला. शिवतिर्थाला बाबाभूमीत परिवर्तित करणारा हा समाज म्हणजे एका दिवशी होणारी गर्दी नाही. ती तशी राहणारही नाही. पण त्यासाठी आमच्या बाबांना योग्य तो सन्मान मिळायला हवा. अजून समाजाला बरीच मजल मारायची आहे. चळवळींचा हा वारसा पुढे चालवायचा असेल तर आमच्या बाबांचा योग्य आदर व्हायला हवा.